बार्शी -  बार्शी तालुक्यातील वैराग येथे पोलिस फौजदाराच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला. चोरट्यांकडून झालेल्या हल्ल्यात युवक मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
 नितीन पांडूरंग मांजरे (वय ३२, मुळ गाव यावली ता.बार्शी, सध्या रा. दासरी प्लॉट, वैराग) असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी पहाटे दिडच्या सुमारास दासरी प्लॉटमधील सेवानिवृत्त फौजदार पांडूरंग मांजरे यांच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला. गेटवरुन उडी मारुन आतील चॅनलगेटचे कुलूप तोडून प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी इतर खोल्यांना कडी लावून तिजोरी असलेल्या तसेच नितीन हा झोपलेल्या खोलीत प्रवेश करुन तिजोरी फोडून चोरी केली. यावेळी चोरट्यांची चाहूल लागल्याने नितीन जागा झाला यावेळी धारधार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला झाला. आरडा ओरड सुरु झाल्यावर घरातील इतरही जागे झाले परंतु त्यांना खोलीला बाहेरुन कड्या लावल्याने बाहेर येता आले नाही. त्यांच्या गोंधळ आणि आरडाओरडीने शेजारी अभिमन्यू बजरंग पंके तसेच आजूबाजूचे इतर रहिवासी जागे झाले. त्यांनी मदत करेपर्यंत तिजोरीतील अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी, रोख ३ हजार रुपये घेऊन चोरटे पळून गेले. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नितीन यास बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले परंतु जखमीची अवस्था पाहून त्यास तात्काळ सोलापूर येथे उपचारास नेण्यास डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सोलापूर येथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सदरच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधिक्षक सर्जेराव ठोंबरे, पोलिस अधिक्षक दत्तात्रय मंडलिक, अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ.प्रशांत परोपकारी, पोलिस निरीक्षक मधुकर पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी श्‍वानपथकाकडून तपास घेण्याचाही प्रयत्न करण्यात आला परंतु त्यामध्ये फारसे यश मिळाले नाही.
नितीन हा मोहोळ तहसिल कार्यालयात कनिष्ठ लिपीक पदावर कार्यरत होता, त्याचा एक ते दिड वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्याची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली होती तसेच एक ते सव्वा महिन्यापूर्वीच त्याला अपत्य झाले होते.
सदरचा दरोडा हा पोलिसाच्या घरावर झाल्याने, चोरट्यांकडून आणि दरोडेखोरांकडून पोलिसांचे घर जिथे सुरक्षीत राहत नाही तसेच हल्लेखोरांकडून कोणाची गय केली जात नाही हे पाहून परिसरात आणि तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 
Top