उस्मानाबाद - ग्रंथोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच झालेल्या अवकाळी पावसाने ग्रंथप्रदर्शनाच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह उभे केले खरे, मात्र, पावसाचे सावट झुगारत दोन्ही दिवस आबालवृद्धांसह सर्वच साहित्य रसिकांनी सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात पुस्तक खरेदीसाठी मोठी गर्दी केली. पावसाच्या अनिश्चिततेचे सावट घेतच ग्रंथोत्सवाला सोमवारी (दि. 2 मार्च) सुरुवात झाली. मात्र, ग्रंथोत्सवाच्या
काळात स्वच्छ सूर्यप्रकाशाचे दर्शन घडले आणि साहित्यरसिकांबरोबरच ग्रंथ प्रकाशक आणि विक्रेत्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला. मागील तीन वर्षाच्या तुलनेत यंदा पहिल्या दोन दिवसात त्यामानाने कमी पुस्तक विक्री झाली असली तरी या विक्रीने दोन दिवसात दोन लाखांचा टप्पा ओलांडला.
ग्रंथोत्सवास दि. 2 मार्च रोजी सुरुवात झाली. त्यातच आदल्या दिवशी उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यासही अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे ग्रंथ प्रकाशक किंवा विक्रेते येतील किंवा कसे याबद्दलच साशंकता होती. मात्र, पावसाची तमा न बाळगता गेल्या तीन वर्षांचा येतील साहित्य रसिकांचा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेत नांदेड, परभणी, औरंगाबाद, सोलापूर, लातूर, औसा, सातारा, पुणे आदी ठिकाणाहून ग्रंथ प्रकाशक व विक्रेते येथे आले. परीक्षांचा हंगाम आणि पावसाचे सावट यामुळे मोठ्या प्रमाणात विक्रीवर परिणाम होईल, ही त्यांची भीती मात्र येथील साहित्य रसिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे फोल ठरली. 
औरंगाबाद येथील शासकीय ग्रंथागाराच्या प्रकाशनांचीही चांगलीच विक्री झाली. सर्वसामान्य रसिक वाचकांसह डॉक्टर्स, वकील, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांनीही मोठ्या प्रमाणात पहिल्या दोन दिवसांत या ग्रंथोत्सवाला भेट दिली. 
दुपारच्या सत्रात ग्रंथप्रदर्शन पाहण्यासाठी काहीशी तुरळक गर्दी असली तरी सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात मात्र मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत होते. लहान मुले चित्रकला, कॉमिक्स बुक्सची पुस्तके खरेदी करताना दिसत होते. याशिवाय वैचारिक, आत्मकथा, कादंबरी अशा पुस्तकांसह आचार्य अत्रे, व. पु. काळे, शिवाजी सावंत, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे जाणवले.   
 
Top