पांगरी (गणेश गोडसे) बार्शी तालुक्यातील महसूल विभागाचा कारभार अत्यल्प कर्मचार्‍यावरच अनेक महिन्यापासून सुरू असून त्यामुळे जनतेला अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. तहसील कार्यालयातील तीन नायब तहसिलदारांच्या जागा ह्या दिड वर्षापासून रिक्त आहेत.या रिक्त जागेबरोबरच तालुक्यातील अनेक मंडल अधिकारी व गाव कामगार तलाठ्यांच्या जागा रिक्त आहेत.जिल्हाधिकार्‍यांनी याकडे लक्ष केन्द्रित करून रिक्त कर्मचार्‍यांच्या जागा भरून जनतेची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे.
    बार्शी तालुक्यातील दहा मंडलपैकी चार मंडलचा कारभार हा रामभरोसेच चालू आहे.बार्शी तालुक्यातील अतिमहत्वाच्या पांगरी,आगळगाव,उपळे दुमाला यासह खुद्द बार्शी मंडललाही मंडलअधिकार्‍यांची जागा रिक्त आहे.नारी,गौडगाव,खांडवी,श्रीपत पिंपरी,पानगाव मंडल अधिकार्‍यांच्या जागा भरलेल्या आहेत.तालुक्यातील चार मंडलला मंडल अधिकारीच नसल्यामुळे त्यांचा कारभार तलाठ्याकडेच सोपवला गेला आहे.शेतीचे खरेदी विक्री व्यवहार,अथवा इतर कोणतेही व्यवहार झाले तरी त्याच्या मंजुरीसाठी व पूर्ततेसाठी मंडल अधिकार्‍याची गरज भासत असते.मात्र जागा रिक्त असल्यामुळे हे सर्व व्यवहार विस्कळीत झाले असून शेतकर्‍यांना वाट पहाण्यापलीकडे काहीच पर्याय राहिला नाही.
  बार्शी तालुक्यातील गाव कामगार तलाठ्यांच्या बारा जागा कर्मचा-याअभावी रिक्तअवस्थेत आहेत॰गाव कामगार तलाठी हा खेड्यातील महसुली वुभागातील अतिशय महत्वाचा दुवा असूनही येवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त ठेवण्यात आल्यामुळे तालुक्यातील जनतेमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गाव कामगार तलाठ्याभावी गावोगावी शेतकर्‍यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे.भरीस भर म्हणजे सध्या तलाठी कार्यालयाचे सर्व सात बार उतारे व इतर दफ्तर हे संगंनकीकृत करण्याचे काम बार्शी तहसील कार्यालयात सुरू असल्यामुळे बार्शी तालुक्यातील सर्व तलाठी हे तहसील कार्यालयातच अडकून पडले आहेत.त्यामुळे महसूल वसुलीचेही काम थंडावले असल्याचे समजते.
  चौकट: बार्शी येथील महसूल विभागातील रिक्त जागेसंदर्भात विधान परिषदेत 4332 या क्रमांकाने तारांकित प्रश्न उपस्थित होऊनही याबाबत अजूनही कोणतीच कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.

 
Top