नळदुर्ग  :- यमगरवाडी (ता. तुळजापूर) येथील एकलव्‍य प्रकल्‍पातील शिक्षिका सौ. प्रणिता उमाकांत मिटकर यांना महिला दिनानिमित्‍त सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्याबद्दल ठाणे येथील विद्युलता प्रतिष्‍ठानच्‍या पुरस्‍काराने गौरविण्‍यात आला. 
ठाणे येथील जिल्‍हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्‍या हस्‍ते प्रसिध्‍द सामाजिक कार्यकर्त्‍या प्रमिला काकड यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सौ. प्रणिता मिटकर यांना रविवार रोजी महिला दिनानिमित्‍त ठाणे येथे पुरस्‍कार देण्‍यात आला. विद्युलता प्रतिष्‍ठान हे महाराष्‍ट्रातील महिलांच्‍या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी काम करते. महिला दिनानिमित्‍त रविवार रोजी महाराष्‍ट्रातील 51 महिलांचा गौरव करण्‍यात आला. त्‍यात तुळजापूर तालुक्‍यातील यमगरवाडी एकलव्य आश्रमशाळेच्‍या शिक्षिका सौ. प्रणिता मिटकर यांचा समावेश होता. 
समाजातील भटके विमुक्‍त, पारधी, मसनजोगी, मरिआई, बहुरुपी यांच्‍या मुलांसाठी वेगवेगळे शै‍क्षणिक प्रयोग मिटकर यांनी राबविले. त्‍यांनी दोन वर्षे वेगवेगळ्या वस्‍त्‍यावर, पालावर जाऊन पूर्णवेळ काम केले. यापूर्वी जिल्‍हास्‍तरीय आदर्श शिक्षिका पुरस्‍कार, पुणे येथील आदर्श सामाजिक कार्यकर्ती पुरस्‍कार, गुणवंत महिला पुरस्‍कार इत्‍यादी पुरस्‍कारांनी प्रणिता मिटकर यांना गौरविण्‍यात आले. मिटकर यांना पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल महाराष्‍ट्र शासनाच्‍या पुरातत्‍व विभागाच्‍या उपसंचालिका डॉ. माया पाटील, डॉ. स्मिता जिंतूरकर, अभियंता वर्षा गोवे, लता नाईक यांच्‍यासह अनेकांनी अभिनंदन करुन शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.  

 
Top