उस्मानाबाद - उस्मानाबाद लातूर, बीड, अहमदनगर, पुणे या पाच जिल्ह्यांसाठी उस्मानाबाद येथे दिनांक 8 एप्रिल ते 18 एप्रिल, 2015 या कालावधीत सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हा मेळावा होणार असल्याचे लष्कराच्या सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल विक्रम दुबे यांनी कळविले आहे. 
जवान (जनरल ड्युटी), जवान (तांत्रिक), जवान (क्लर्क/एसकेटी), जवान (नर्सिंग असिस्टंट) आणि जवान (ट्रेडसमन) या पदांसाठी ही सैन्य भरती होणार आहे. दि. 8 एप्रिल रोजी पुणे जिल्हा, 9 एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यातील युवकांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. दि. 10 एप्रिल रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, उमरगा, लोहारा आणि तुळजापूर तर दि. 11 एप्रिल रोजी कळंब, वाशी, भूम आणि परंडा तालुक्यातील युवकांसाठी भरती प्रक्रिया होईल. दि. 12 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता आणि राहुरी तर दि. 13 एप्रिल रोजी नेवासा, श्रीरामपूर, अहमदनगर, पारनेर आणि शेवगाव, दि. 14 एप्रिल रोजी पाथर्डी, कर्जत, जामखेड आणि श्रीगोंदा या तालुक्यातील युवकांसाठी सैन्य भरती प्रक्रिया होईल.  दिनांक 15 एप्रिल रोजी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, माजलगाव, वडवणी आणि धारुर तर दि. 16 एप्रिल रोजी केज, परळी, बीड आणि आष्टी तालुक्यातील युवकांसाठी सैन्य भरती होईल. दि. 17 एप्रिल रोजी बीड जिल्ह्यातील पाटोदा, शिरुर कासार आणि गेवराई तालुक्यासाठीची सैन्य भरती प्रक्रिया होईल. 
दि. 18 एप्रिल रोजी  सेवारत, माजी सैनिकांचे पाल्य, युद्ध विधवांचे पाल्य आदींच्या साठी सैन्य भरती प्रक्रिया होईल, असे कळविण्यात आले आहे.
अतिशय खुल्या आणि पारदर्शक पद्धतीने सैन्य भरती प्रक्रिया होत असल्याने युवकांनी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या मार्गाचा अवलंब करु नये आणि आमीषांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 
सैन्यभरतीसाठी जवान (जनरल ड्युटी) या पदासाठी वय साडेसतरा ते 21वर्षे दरम्यान असावे, दहावी इयत्ता किमान 45 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण असावा, शारिरीक क्षमता- उंची 168 सेंमी, वजन 50 किलो आणि  छाती  77 सेंमी (फुगवून 5 सेंमी जास्त) असावी. 
जवान (तांत्रिक) या पदासाठी वय साडेसतरा ते 23 वर्षे दरम्यान असावे, बारावी (विज्ञान) इयत्ता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी घेऊन उत्तीर्ण असावा, शारिरीक क्षमता- उंची 167 सेंमी, वजन 50 किलो आणि  छाती  76 सेंमी (फुगवून 5 सेंमी जास्त) असावी.
जवान (क्लर्क/एसकेटी) पदासाठी वय साडेसतरा ते 23 वर्षे दरम्यान असावे, बारावी इयत्ता (कला/विज्ञान/वाणिज्य) किमान 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण असावा आणि प्रत्येक विषयात किमान 40 टक्के गुण आवश्यक, इंग्रजी आणि गणित/अकाउंट/बुक कीपिंग हे विषय 10 वी आणि बारावीतही अभ्यासलेले असावेत आणि दोन्हीत किमान 40 टक्के गुण असावेत.  शारिरीक क्षमता- उंची 162 सेंमी, वजन 50 किलो आणि  छाती  77 सेंमी (फुगवून 5 सेंमी जास्त) असावी.
जवान (नर्सिंग असिस्टंट) पदासाठी वय साडेसतरा ते 23 वर्षे दरम्यान असावे, बारावी (विज्ञान) इयत्ता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी घेऊन किमान 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण असावा,  शारिरीक क्षमता- उंची 167 सेंमी, वजन 50 किलो आणि  छाती  77 सेंमी (फुगवून 5 सेंमी जास्त) असावी.   
जवान (ट्रेडसमन) पदासाठी वय साडेसतरा ते 23 वर्षे दरम्यान असावे, दहावी अथवा आठवी  इयत्ता उत्तीर्ण असावा, शारिरीक क्षमता- उंची 168 सेंमी, वजन 48 किलो आणि  छाती  76 सेंमी (फुगवून 5 सेंमी जास्त) असावी. 
सैन्य भरती मेळाव्यासाठी येताना उमेदवारांनी  स्वताचे पासपोर्ट आकाराचे 16 छायाचित्रांच्या प्रती, शैक्षणिक पात्रता, डोमिसाईल प्रमाणपत्र, जातीचा दाखला (खुल्या प्रवर्गासाठी सरपंचाचा दाखला तर राखीव जागांसाठी संबंधित प्राधिकाऱ्याने दिलेला दाखला), चारित्र्य अहवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, तसेच एनसीसी आणि क्रीडाविषयक कौशल्याचे प्रमाणपत्र यांच्या मुळ प्रती एका झेरॉक्स सेटसह आणणे अत्यावश्यक राहील. याबाबत अधिक माहिती जवळच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालय येथेही मिळू शकेल अथवा www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होऊ शकेल, असे नमुद करण्यात आले आहे.                          

 
Top