बार्शी -  हॉटेल्स, खानावळी, पानटपर्‍या, हातगाड्यांतून राजरोसपणे अवैध दारुविक्री होत असल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याचे सांगत यावर्षी सर्वच्या सर्व बार परमीटरुम चालक परवाना नूतनीकरण करणार नसल्याचे आणि १ एप्रिलपासून दारु विक्री बंद करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकार्‍यांसह विविध अधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिला असल्याची माहिती बार्शी शहर बार व परमीट रुम असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
 शासनाला दारुविक्रीच्या परवान्यासाठी तसेच करापोटी दरवर्षी लाखो रुपये भरणा करणार्‍या बार आणि परमीटरुमधारकांनी अनोख्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे प्रत्येकवर्षी परवाना नूतनीकरण करण्यासाठी प्रत्येकी सुमारे दोन लाख तसेच वर्षभराच्या विविध कराचे सुमारे तीन लाख अशा पाच लाख रुपयांचा शासनाचा महसूल बुडणार आहे. बार्शी शहर आणि परिसरात सुमारे एकवीस बार व परमीट रुम लायसनधारक आहेत. या लायसनधारकांना दरवर्षी शासनाच्या परवाना नूतनीकरणाची फी, विक्री कर आदी प्रकारच्या सुमारे पंधरा ते सोळा कार्यालयांचे परवाने तसेच नियमानुसार कर भरावे लागतात. परंतु कोणत्याही प्रकारचे परवाने नसतांना शासनाची फसवणूक करुन अवैध मार्गाने दारु विक्री करणार्‍या सुमारे शंभराहून अधिक अवैध विक्रेत्यांकडून राजरोसपणे दारु विक्री करण्यात येते. त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असलेले अधिकारीच सदरच्या अवैध व्यावसायीकांच्या पाठीशी असल्याने परवानाधारकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. विविध करामुळे होणार्‍या दरातील तफावतीमुळे ऐंशी टक्के मद्यपी अवैध विक्रेत्यांकडे वळले आहेत. यामुळे अगोदरच शासनाच्याही महसूलावर परिणाम झाला असून उर्वरित मिळणार्‍या करावरही या आंदोलनामुळे परिणाम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेत बार व परमीट रुम असोसिएशनचे अध्यक्ष विजय चोप्रा, अमर शेट्टी, राजाभाऊ बालवाडे, बाळासाहेब बारबोले, सागर मस्के, प्रशांत सांगळे, रुपेश हिबारे, शिवाजी सोत्रे, कृष्णा सोरेगावकर, सुनील जानराव, धनंजय चव्हाण, अनिल माने आदी व्रिक्रेते उपस्थित होते.

 
Top