उस्मानाबाद - लोकशाही दिनामध्ये प्राप्त झालेल्या प्रकरणाचा सर्व यंत्रणा व खाते प्रमुखांनी लोकांना सेवा देवून लवकरात लवकर त्यांना न्याय मिळवून देण्याची कार्यवाही करावी. प्राप्त तक्रारी तातडीने निकालात काढावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी यांच्या सभागृहात लोकशाही दिनानिमीत्त  सर्व कार्यालय प्रमुखांच्या बैठकीत डॉ. नारनवरे बोलत होते. 
या बैठकीस जिल्हा परीषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, निवासी  उपजिल्हाधिकारी  श्रीरंग तांबे, शिल्पा करमरकर,‍प्रभोदय मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, नगरविकास विभागाचे शशिमोहन नंदा, सरकारी वकील ॲड. शिंदे, सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधक श्री. बडे, अतिरीक्त पोलीस अधिक्षक बाळकृष्ण भांगे, सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
डॉ. नारनवरे पुढे म्हणाले की, सर्व कार्यालय प्रमुखांनी कार्यालयात प्राप्त तक्रारीची दखल घेवूनकार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नियमित बैठका घेवून कामे वेळेत करुन घ्यावी. जे कर्मचारी या कामात कामचूकारपणा करतील त्यांचेवर जबाबदारी निश्चीत करुन कार्यवाही करावी. 1 जानेवारी 2013 पासून ते आजअखेर किती अर्ज प्राप्त झाले, किती प्रकरणे निकाली काढण्यात आली, सध्या किती प्रकरणे प्रलंबित आहेत त्या प्रकरणाचा तपशील  अहवाल लोकशाही दिनाच्या अगोदर न चूकता सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
भूमि अभिलेख विभागाने शेतकरी जमीन मोजमापीसाठी शुल्क भरल्यास त्यांना तातडीने जमीनीचे मोजमाप करुन दिल्यास शेतकऱ्यांचे वादाचे अनेक प्रश्न तेथेच मिटतील. असा आशावाद व्यक्त केला. वीज मंडळाने शेतकरी मीटरससाठी रक्कम भरल्यानंतर त्यांना वीजेचा पुरवठा करावा. नगरपालिकेने अनाधिकृत बांधकामाविरुध्द दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करावी.  नगर विकास व नगर पालीकेने शासकीय सोसायटीत व इतर ठिकाणच्या जमीन किती  मोकळया आहेत त्या मोकळया जागेची यादी तयार करुन कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही  त्यांनी केल्या. बऱ्याचदा तक्रारदारास जिल्हास्तरावर होणाऱ्या लोकशाही दिनास हजर रहावे लागते. त्यांचा येण्या-जाण्याचा त्रास वाचावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे डॉ. नारनवरे म्हणाले.               

 
Top