उस्मानाबाद -  जगात सर्वत्र हजारो भाषा जन्माला आल्या. तसेच हजारो भाषा लोप पावल्या, नष्ट झाल्या. हा प्रकार सुरूच राहणार आहे. भाषा टिकणे, वाढणे, समृद्ध होणे म्हणजे काय? आणि त्याची कारणे कोणती ? भाषांचा संगम, समन्वय कसा होतो ? भाषा लोकांची आणि राज्याची कशी तयार होते ? प्रांत, जाती, धर्म, देश, परंपरा इत्यादी गोष्टींचा भाषेशी काय, कसा, किती संबंध असतो ? कसा निर्माण होतो ? अशी विस्तृत चर्चा मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचीत्य साधून करण्यात आली. 
सरस भारत अकादमीच्यावतीने शहरातील यशश्री क्लासेसच्या सभागृहात भाषा, विज्ञान आणि समाज या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात ऍड. राज कुलकर्णी, रविंद्र केसकर यांनी भाषाविषयक मांडणी केली. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार यांची उपस्थिती होती. 
या चर्चेत ऍड. राज कुलकर्णी यांनी, अगदी सहज आणि सविस्तर विवेचन केले. जगातील विविध खंडात आणि कालखंडात भाषा कशा अवगत झाल्या. भारतात काय घडले ? या बद्दलही मांडणी झाली. विज्ञान आणि समाज यांच्या एकत्र व्यासंगातून त्यांनी जगभरात झालेल्या भाषाविषयक बदलांची माहिती यावेळी दिली.  
रवींद्र केसकर यांनी दखनी आणि उर्दू समन्वय समजावून सांगितला. यावेळी कवी डी. के. शेख, सुनिल बडुरकर, माधव इंगळे, यशश्री क्लासेसचे संचालक रवि निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

 
Top