उस्मानाबाद -  शेतक-यांच्या जीवनातील वेदना, संघर्ष, जिद्द आणि भावी आयुष्याची स्वप्ने रंगविणा-या कवितांनी उस्मानाबादकर रसिकांना अंतर्मुख केले. मराठवाड्यातील नामवंत कवींनी बळीराजाच्या जीवनातील सुखदु:खाचं शब्दांतून मांडलेलं चित्र रसिक श्रोत्यांना काही काळ नि:शब्द करुन गेलं. निमित्त होतं, जिल्हा माहिती कार्यालयानं आयोजित केलेल्या ग्रंथोत्सव उपक्रमाचं. या उपक्रमात दुस-या दिवशी (दि. 3 मार्च) शेतक-यांच्या जीवनातील वेदना अन् संघर्ष मांडणा-या बळीराजाच्या कविता या कार्यक्रमाला रसिकांनी चांगलीच दाद दिली.
मराठवाड्यातील नामवंत कवी बालाजी इंगळे (उमरगा), शंकर वाडीवाले (नांदेड), चंद्रशेखर मलकमपट्टे (लातूर), प्रा. अरविंद हंगरगेकर (तुळजापूर), प्रमोद माने (उमरगा), रविंद्र केसकर (उस्मानाबाद) आणि किसन घारुळे (लातूर) यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. तुझा पाऊस मला दे..माझा पाऊस तुला या कवितेने  शंकर वाडीवाले यांनी कविसंमेलनाची सुरुवात केली. शब्दांतून व्यक्त होणा-या भावनांशी रसिक श्रोते कधी एकरुप झाले ते कळलेच नाही. प्रत्येक कवितेनिशी श्रोत्यांची ती तन्मयता विषयांचं गांभीर्य स्पष्ट करीत कवितेला दाद देत गेली. कधी वास्तव तर कधी उपहास..कधी स्वप्न तर कधी भीषण भूतकाळाची जाणीव देत कवींची ही मैफील पुढे सरकत होती. 
नांदेडच्या चंद्रशेखर  मलकमपट्टेंची गोट्याचा डाव ही समाजजीवनातील भयाण वास्तव दाखविणारी कविताही श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. प्रमोद मानेंची आपलाच काटा निघतो या कवितेने वास्तव चित्रण शब्दांतून श्रोत्यांसमोर मांडलं.  किसन घारुळे यांची उमाळा ही कविताही दाद घेऊन गेली.
प्रा. हंगरगेकर यांच्या गेय कवितांना श्रोत्यांना चांगलीच दाद दिली. गेला कुठं घावना पावसाचा थेंब... जळूनी गेलं सारं उगवलेलं कोंब असं वास्तव रेखाटतानाच त्यांनी कवितेच्या शेवटी पुन्हा येतील पावसाचं थेंब.. असा आशावाद व्यक्त केला. 
बालाजी इंगळे यांची शेतकरी बापाचं वर्णन करणारी रान नभात आणि चित्र या कविताही श्रोत्यांचा ठाव घेऊनी गेल्या. वाडीवाले यांची आता पेटवू सारे रान..प्रमोद माने यांची उमेद या कवितांना रसिकांनी उत्तम आनंद दिला. कवी रविंद्र केसकर यांच्या कवितांनी या कार्यक्रमाला अधिक उंचीवर नेले.

 
Top