बार्शी - जानेवारीमध्ये लग्नघरी दरोडा घालणार्‍या आरोपींचा शोध घेऊन त्यापैकी तीन आरोपींना पोलिस तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल बोस यांनी अटक केली. बार्शी न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी भागवत झिरपे यांच्या कोर्टात आरोपींना उभे केले असता चार दिवसांची पोलिस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली.
भरत विलास भोसले (वय २५, रा.पिंपरी ता.आष्टी जि.बीड), सुरेश ईश्वर भोसले (वय २३, रा.बेलगाव ता.कर्जत जि.नगर), गजानन देवराव मैड (वय २६, रा.गुणवडी ता.नगर) असे अटक करण्यात आलेल्या व पोलिस कोठडीची शिक्षा मिळालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, बार्शीपासून ३ किमी अंतरावर असलेल्या तीन घरावर १० ते १५ दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून तिघांना जखमी करुन सुमारे दोन लाखांच्या दागीन्यांची चोरी केल्याची घटना २१ जानेवारी रोजी पहाटे घडल्याची फिर्याद बार्शी पोलिसांत दाखल करण्यात आली होती. सुमारे दोन महिन्यापूर्वी घरातील दरोड्याच्या प्रसंगामुळे संकटाची कुर्‍हाड कोसळलेल्या कुटूंबातील मुलीचे लग्न मुस्लिम समाजबांधवांनी एकत्रपणे मदतीचा हात पुढे करुन थाटात लावले होते.
बार्शीपासून ३ किमी अंतरावरील संगम आशिर्वाद नगर, नागोबाची वाडी येथील हुमायून इसाक शेख-मिस्त्री (वय ४६) यांच्या घरात गुरुवारी मुलीचे लग्न होते. उग्नानिमित्त त्यांच्याकडे नातेवाईकांची रेलचेल होती. रात्री उशीरापर्यंत त्यांच्याकडे गप्पा सुरु असल्याने सर्वजण जागेच होते. रात्री उशीराने बाहेर झोपलेल्या शेख व त्यांच्या नातेवाईकांना अज्ञात चोरट्यांनी जे काही असेल ते द्या अशी मागणी करुन घराचे दरवाजे उघडण्यासाठी मागणी केली व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या घराचे दार तोडून घरात बळजबरीने प्रवेश करुन महिलांच्या अंगावरील तसेच तिजोरीतील सोन्याचे दागीने व रोख रक्कम घेतली. तसेच शेजारी असलेल्या इतरही घरांत याच प्रकारे मौल्यवान वस्तूंची चोरी केली.

 
Top