पांगरी (गणेश गोडसे) :- आजच्या आधुनिक युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कोणत्याही क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारी स्त्री ही अबला नसून सबला झाल्याचे निदर्शनास येत आहे. आज 8 मार्च हा दिवस आज समाजात मोठ्या उत्साहात 'जागतिक महिला दिन' म्हणून साजरा होत आहे. समाजातील असामान्य कर्तूत्वान स्त्रियांचा यानिमित्ताने सन्मान होत आहे.
कधी काळी घरचा उंबरठाही न ओलांडणारी स्त्री आज चंद्रावर जावून आली. रूढी,पुळचट परंपरा,चाली,रिती,भाती,समाजाची बंधने या सर्वांना झुगारून बंधनातून बाहेर पडून स्त्रियांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. क्वचित प्रसंगी पुरुषानाही लाजवेल असे प्रताप कांही स्त्रियांनी करून दाखवण्यात कोणतीच कमतरता ठेवलेली नाही.
    जागतिक महिला दिनी अशा कर्तूत्त्व संपन्न स्त्रियांचा मान, सन्मान होऊन त्यांना समाजात ऊंची प्राप्त व्हावी, त्यांचे कर्तुत्व समाजाला समजावे यासाठी या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव, अतुलनीय कार्य करणार्‍या महिलांचा वेगवेगळ्या पातळीवर सन्मान केला जातो. आज गल्लीपासुन दिल्लीपर्यंत स्त्रियांनी आपल्या कर्तुत्वाने दबदबा निर्माण केलेला पाहावयास मिळतो. कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, सैन्य, पोलिस, आरोग्य आदी विविध क्षेत्र स्त्रियांनी केव्हाच पादाक्रांत केली आहेत. स्त्रिया हे करू शकतील का? हा समाजाच्या भ्रमाचा भोपळा या जिद्दी महिलांनी आपल्या कार्यकर्तृत्‍वाने केव्हाच फोडून टाकला आहे. तेव्हा कुठे समाज आज या स्त्रीयांकडे जरा वेगळ्या पद्धतीने पाहू लागला आहे. चूल आणि मूल ही महिलांच्या बाबतीत असलेली जुनी ओळख केव्हाच पुसण्यात महिलांना यश आले आहे॰
  प्रारंभी स्त्रियांना घराबाहेर पडायला खूप निर्बंध होते. मात्र काळाच्या ओघात व समाजसुधारकांनी केलेल्या त्यागातून ही बंधने केव्हाच गळून पडली. आज जागृत महिला विमान, रेल्वे, एस.टी.बस ट्रक आदि विविध क्षेत्रात जिद्दीने काम करताना दिसत आहेत. कांही वर्षापूर्वी स्त्रिया एस.टी.बस चालवू शकतील याच्यावर कोणीही विश्वास ठेवला नसता मात्र आज हे सर्व सत्यात उतरले आहे. संसाराचा गाडा आज पर्यंत फक्त पुरुषांच्याच खांद्यावर असायचा मात्र स्त्रियाही आज संसाराचा गाडा हाकू लागल्या आहेत. स्त्रिया मुलगी संपली तर जग संपेल. स्त्रियांशिवाय पुरुष अपूर्णच आहे. स्त्री ही आजच्याच नव्हे तर सकल जगाची माऊली आहे. सर्वच क्षेत्रात महिलांचे वर्चस्व पहावयास मिळत आहे.
  आज उद्योग धंद्यामध्येही महिला मागे नाहीत. अनेक छोटे, मोठे लघु उद्योग, गृह उद्योग उभे करून त्यातून महिलांनी समाजातील दुर्लक्षित महिलांना उभे करण्याचा विडा उचलला आहे. अनेक ठिकाणी महिलांनी उद्योग व्यवसाय यात उल्लेखनीय काम केले आहे. त्याची दखलही सगळीकडे घेण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील दुर्लक्षित स्त्रीयांही आज समाजाच्या मुखी प्रवाहात येत आहेत. बचत गट, शिक्षण आदीमुळे महिला एकत्रित येऊन आरोग्य, दैंनंदिन गरजा, त्यांचे विविध प्रश्न याचा त्या ओहापोह करू लागल्या आहेत. बचतीचे महत्व ओळखून बचतीमधून छोटे-छोटे गृह उद्योग त्या उभे करू लागल्या आहेत. ही बाब ग्रामीण भागाच्या दृष्टीने नक्कीच आशादायी आहे.

 
Top