बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) जिल्ह्यासह सर्व तालुका कृषि कार्यालयीन कामकाजात प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. शासनाच्या योजना राबवतांना मोठ्या प्रमाणात शेतकरी व शासनाची फसवणूक करण्यात आल्याने गावोगावी ग्रामसभेत माहिती घेऊन अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशी करावी यासह अनेक मागण्यांचे लेखी निवेदन रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांसह विविध विभागांना देण्यात आले आहे.
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई एकरी जिरायतसाठी २५ हजार, बागायतसाठी ५० हजार, खरीप हंगाम विम्याची नुकसान भरपाई, साखर कारखानायांमार्फत चुकीची रिकव्हरी दाखवून शेतकर्‍यांची होणारी फसवणूक बंद करुन संचालकांवर गुन्हे दाखल करावे, न्यायालयीन प्रलंबीत प्रश्‍नावर निर्णय होईपर्यंत शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडू नये, बाजार समित्यांतील जादा आडत, इलेक्ट्रॉनिक काटे न वापरता मालाचा फरक, हमीभावपेक्षा कमी भावानो खरेदी-विक्री करणार्‍या अडत्यांवर व संचालकांवर गुन्हे दाखल करावे, शिधापत्रिकेवरील धान्य व केरोसीनचा काळाबाजार बंद करावा, परवान्यापेक्षा जादा वाळूची वाहतूक बंद करावी अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर युवा जिल्हाध्यक्ष औदुंबर मोरे, पंजाबराव भोसले, सिध्देश्वर हेंबाडे, सुनिल बिराजदार, महंमद शेख, महेश केदार, बाळासाहेब वाळके, गोरख घाडगे, सुनिल कानगुडे, समाधान गुळवे आदींच्या स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत.

 
Top