उस्मानाबाद - सेंद्रीय गुळ, मसाल्याचे पदार्थ, महाबळेश्वर येथील प्रसिद्ध मध यासह विविध वस्तूंची प्रदर्शन आणि विक्री उपक्रमास येथील यशराज लॉन्स येथे प्रारंभ झाला. उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांच्या हस्ते या    उपक्रमाचा प्रारंभ झाला.  पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गंत केंद्र शासन, महाराष्ट्र खादी  व ग्रामोद्योग मंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 
    जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी भीमराव दुपारगुडे, जिल्हा लघु उद्योग भारती संघटनेचे अध्यक्ष प्रवीण काळे, उद्योजक संतोष शेटे, सुनील गर्जे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी. हणबर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ए.के. खेडकर आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.या प्रदर्शनात ग्रामीण उद्योजकांनी तयार केलेली उत्पादनांचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. आवळा उत्पादने, पेपर प्लेट, मेणबत्ती, मसाल्याचे पदार्थ, आर्युर्वेदीक  वनौषधी, शेवया, पापड, बेकरी उत्पादने, गारमेंट, खवा, पेढा, महाबळेश्वर येथील प्रसिद्ध मध आदींचे वेगवेगळे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. येत्या 28 मार्चपर्यंत सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.प्रदर्शनाचे उदघाटन केल्यानंतर बोलताना उपजिल्हाधिकारी श्री. कुलकर्णी म्हणाले की, नवीन उद्योजकांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न अशा प्रदर्शन आणि विक्री उपक्रमातून होत आहे. ग्रामीण भागातील नवीन युवक- युवतींना त्यामुळे प्रेरणा मिळत आहे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होत आहे. ही कौतुकाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील उद्योजकही अशा कार्यक्रमांना येऊन नव उद्योजकांची उमेद वाढवितात, ही बाब आगामी काळात जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला पूरक असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी श्री. दुपारगुडे यांनी, ग्रामीण भागातील तरुण- तरुणी उद्योग क्षेत्रात काही करु पाहतात, ही चांगली बाब असल्याचे सांगितले. जिल्हा उद्योग केंद्रातून प्रसिक्षण घेतलेल्या अशा नव उद्योजकांच्या मदतीसाठी बॅंका निश्चितच पुढाकार घेतात, असे आवर्जून सांगितले.लघुद्योग भारतीचे अध्यक्ष पी. आर. काळे यांनी सर्व नव उद्योजकांना शुभेच्छा दिल्या. छोट्या उद्योगातून स्वयंपूर्ण होण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना जिल्ह्यातील उद्योजक, उद्योग केंद्र आणि बॅंका निश्चितच पाठिंबा देतील, असेही त्यांनी नमूद केले.
     प्रास्ताविकात जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. खेडेकर यांनी प्रदर्शन आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली तसेच खादी व ग्रामोद्योग विभागाच्या वतीने केलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी विविध प्रशिक्षण प्राप्त केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र  प्रदान करण्यात आले. तसेच विविध योजनांसाठी कर्ज मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी पाच लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व धनादेशाचे वितरण यावेळी करण्यात आले. यावेळी पल्लवी पाटील, दुर्गादेवी आवटे, नवीन बनसोडे या प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व्ही.टी. चव्हाण यांनी केले. जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन, खादी ग्रामोद्योग आदी विभागांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी हे प्रदर्शन आयोजित करण्यात सहभाग घेतला आहे. 

 
Top