नळदुर्ग  :- वागदरी (ता. तुळजापूर) येथील भवानसिंग महाराज यांची यात्रा दि. 13 मार्च रोजी होत असून यात्रेनिमित्‍त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंदीर समितीच्‍यावतीने करण्‍यात आले आहे. 
गुरुवार दि. 12 मार्च रोजी जागराचा कार्यक्रम होणार असून रात्री चक्री भजन, किर्तन होणार आहे. याचदिवशी सायंकाळी चुंगी (ता. अक्‍कलकोट) येथून भवानसिंग महाराजाची पालखी मानक-यासह भक्‍तांचे तुळजापूर तालुक्‍यातील वागदरी येथे आगमन होते. यावेळी उपस्थित भाविक भक्‍तांना मंदीर समितीच्‍यावतीने प्रसादाचे वाटप करण्‍यात येते. 
शुक्रवार दि. 13 मार्च रोजी सकाळी ह.भ.प. राम गायकवाड यांचे प्रवचन, दुपारी राही फोडण्‍याचा कार्यक्रम होणार असल्‍याची माहिती मंदीर समितीचे सुरेश परिहार महाराज यांनी दिली. यात्रेनिमित्‍त आयोजित धार्मिक कार्यक्रम व यात्रा सुरळित पार पाडण्‍यासाठी सरपंच राजेंद्र पवार, विजयसिंग ठाकूर, दत्‍तात्रय पाटील, कृष्‍णा वचने, तुकाराम वचने, किसन पाटील, शिवाजी मिटकर, महादू बिराजदार, धनंजय बिराजदार आदीजण परिश्रम घेत आहेत.

 
Top