दिल्ली -  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मांडलेले विवेकवादाचे विचारच देशाला प्रगतीपथावर नेतील असा आशावाद भारताचे उपराष्ट्रपती श्री. हमीद अन्सारी यांनी डॉ.दाभोलकर लिखित ‘तिमिरातूनि तेजाकडे’ ह्या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाचे लोकार्पण करताना काढले .  ‘अंधश्रद्धा उन्मूलन आचार ,विचार और सिद्धांत’, ह्या नावाने राजकमलप्रकाशन ह्या हिंदीतील आघाडीच्या प्रकाशनसंस्थेद्वारे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले . आपल्या भाषणात उपराष्ट्रपती पुढे म्हणाले कि समाजिक सुधारणांसाठी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हे अत्यंत महत्वाचे काम आहे .ह्या कामाच्या पाठीशी असलेले विवेकवादाचे सूत्र केवळ अंधश्रद्धा निर्मुलनासाठीच नाही तर आयुष्याचा सर्व लढायांमध्ये महत्वाचे आहे.
     एकदा माणसाचे विचार पक्के झाल्यावर हे काम करणे अवघड होते म्हणून विवेकी मन घडवण्याचे काम हे शाळा आणि महाविद्यालयांच्या मधून होणे आवश्यक आहे असेदेखील त्यांनी नमूद केले . जादूटोणा विरोधी कायद्याचे महत्व अधोरेखित करताना त्यांनी ज्या समाजामध्ये अघोरी अंधाश्राद्धाना मोठ्या प्रमाणांत जनता बळी पडत असते त्या ठिकाणे असे कायदे असणे महत्वाचे असते व त्या मुळेच जादूटोणा विरोधी कायद्या सारखा कायदा देशभर व्हायला हवा असे हि  मत मांडले . 
  पुढे ते म्हणाले, डॉ दाभोलकरांच्या अनुपस्थिती मध्ये हे पुस्तक  प्रकाशित करावे लागत असल्याचे आपणास दु:ख असून ,समाज हिताचे काम करणाऱ्या डॉ दाभोलकारांचा आपल्या समाजात खून होतो हि निंदनीय बाब आहे . ज्या दिवशी डॉ दाभोलकरांचा खून झाला तो  वीस ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे असे सांगून  डॉ दाभोलकरांचे मारेकरी लवकर पकडले जावेत अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.ख्यातनाम हिंदी लेखक नामवर सिंह ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्याकार्म पार पडला . मुक्ता दाभोलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. पुस्तकाचे संपादक श्री सुनीलकुमार लवटे ह्यांनी डॉ दाभोलकरांच्या निर्घूण खूनानंतर त्यांचे विचार हिंदी भाषिकांपर्यंत पोहचवण्या साठी आपण आपले सहकारी डॉ चंदा गिरीश , डॉ विजय शिंदे आणि प्रकाश कांबळे ह्यांच्या  मदतीने हे प्रयत्न केल्याचे नमूद केले . अनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील ह्यांनी डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या पश्चात अनिसचे काम निर्धाराने  चालू असून ह्या पुस्तकाने अनिसचे काम हिंदी भाषिक लोकांच्या मध्ये पोहचण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला . राजकमल प्रकाशनाचे प्रतिनिधी, खासदार हुसेन दलवाई , गांधी स्मारकच्या संचालक श्रीमती मणिमाला आणि विविध खेत्रातील मान्यवर ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते .  
 
Top