बार्शी - तालुक्यातील खांडवी येथे गावच्या जत्रेत सुरु असलेल्या बायांची नाचगाणी पाहण्यासाठी झालेल्या गर्दित पाठीमागून कोणीतरी धक्का दिल्याच्या कारणावरुन हाणामारीची घटना घडली. सदरच्या हाणामारीत चारजण जखमी झाल्याने त्यांना बार्शीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
    अतुल चव्हाण, अन्वर शेख, रवि गायकवाड, गणेश लोंढे असे भांडणात डोक्याला मार लागल्याने जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमी अतुल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवरुन शनिवारी रात्री ११ च्या सुमारास खांडवी शिवारात सदरचा प्रकार घडला. रविवारी पहाटे उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जखमींनी बार्शी पोलिसांना हकीकत सांगीतली. पाठीमागून कोणीतरी ढकलल्याने पुढे उभे असलेल्या गव्हाणे आणि बारंगुळे यांच्या अंगावर ढकलले गेल्याने त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यानंतर थेट त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. स्टीलच्या रॉड, दांडके, मोठा बार तसेच एकाच्या हातात चाकू असल्याचेही चव्हाण यांनी सांगीतले.
    खांडवी गावचा भाग वैराग पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलस्याने वैराग पोलिसांत याबाबत चौकशी केली असता आमच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगीतले. बार्शी पोलिसांना याबाबत विचारणा केली असता अगोदर असा प्रकार झाला नसल्याचे सांगीतले तर प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात येऊन जखमींनी नावे सांगीतल्यानंतर आमच्याकडे केवळ जखमी प्रत्यक्ष येऊन उपचारासाठी येऊन दवाखान्यासाठी चिठ्ठी घेऊन गेल्याचे सांगत याबाबत पांगरी पोलिस जखमींची चौकशी करुन माहिती घेऊन पुढील कारवाई करतील असे सांगण्यात आले.
 
Top