बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर)   शहरातील मांगडे चाळ परिसरात होणारा पाणीपुरठा दूषित झाल्याने सुमारे दोनशे रुग्णांना हगवणीचा त्रास सुरु झाला आहे. परिसरातील दवाखान्यांत रुग्णांवर उपचार सुरु असून नागरिकांनी बार्शी नगरपरिषदेकडेही तक्रारी दिल्या आहेत.
   मागील आठवड्यापासून नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे उलट्या, जुलाबाचा त्रास होत असल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहेत. या भागातील वैद्यकिय व्यवसाय करणार्‍या डॉ.थोरबोले, डॉ.कवडे, डॉ.कोंढारे यांच्याशी चर्चा केली असता मागील चार-पाच दिवसांपासून उलट्या-जुलाबाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
सदरच्या परिसरातील सांडपाण्याच्या गटारांची अवस्था ही तुंबलेली आहे. या भागात पिण्याची पाईपलाईन काही ठिकाणी गटारांच्या वरुन तर काही ठिकाणी खालून असल्याने यातील गटाराच्या खालून कुठेतरी खराब असल्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविण्यात येते. सदरच्या भागात होणार्‍या पाणीपुरवठ्यात गाळमिश्रीत पाणी आल्याचे तसेच त्याचे नमुने नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे दिल्याचे नागरिकांनी सांगीतले.
नगरपरिषेकडून याबाबत तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यावर उपाय तात्काळ लक्ष न दिल्यास रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. आसपासच्या दवाखान्यांत परिसरातील अनेक महिला, वृध्द, तरुण, बालके यांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. परिसरातील डॉक्टरांनी रुग्णांना पाणी उखळून व गाळून पिण्याचा सल्ला दिला आहे.
उजनी जलाशयाची पाईपलाईन गळती लागल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. दरम्यान तीन दिवस पाणीपुरवठा बंद होता, या काळात गटाराखालून असलेल्या पिण्याच्या पाईपलाईच्या गळतीमधून गटारांचे पाणी जाऊन तीन दिवस साठले, तसेच पाणीपुरवठा नियमित झाल्यानंतर सर्व भागांत दूषित पाणीपुरवठा झाला असल्याचे काही नागरिक सांगत आहेत. नेमकी गटाराखालून असलेली पाईपलाईन कोणती आहे गळती कुठे झाली याचा शोध घेऊन दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे.

 
Top