उस्मानाबाद -  श्री. तुळजाभवानी मातेच्या चैत्र पोर्णिमा यात्रेस सुरूवात झाली आहे.  ही यात्रा 05 एप्रिल पर्यंत चालणार आहे. या यात्रेसाठी महाराष्‍ट्रासह परप्रांतातील भाविक मोठया प्रमाणात येतात.  यात्रा काळात यात्रेकरुंची गैरसोय टाळण्यासाठी  जी वाहने अधिकृत पार्कींग वगळता रस्त्यावर उभी केली जाणार आहेत. त्या वाहनामुळे यात्रेकरुंना त्रास होणार असल्याने वाहनचालक व मालकांनी आपले वाहन पार्कीग मध्येच पावती घेऊनच उभे करावे, अन्यथा अशा वाहनावर आणि नंबर प्लेट नसलेल्या वाहनां
वर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागांना जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी दिले.
               तुळजापूर येथील सर्कीट हाऊस येथे जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली चैत्र पोर्णिमा यात्रेच्या अनुषंगाने संबंधित विभागांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तुळजापूरच्या नगराध्यक्षा जयश्री कंदले, उप विभागीय अधिकारी  अभिमान्यु बोधवड, उपविभागीय पोलीस अधिकारी मोहन विधाते, न.प.मुख्याधिकारी राजीव बुबणे, मंदीर संस्थानचे तहसीलदार सुजित नरहरे, श्री.किशोर गंगणे, श्री.दिलीप नाईकवाडी यांच्यासह विविध विभाग अधिकारी, पूजारी मंडळाचे पदाधिकारी  यांची उपस्थिती होती.   
        जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे म्हणाले की, या यात्रा काळात सर्व विभागांनी समिती तयार करुन यात्रेच्या नियोजनाबाबत आराखडा तयार करावा. मंदीरामध्ये व बसस्थानकामध्ये नियंत्रण कक्षाची स्थापना करणे. संशयित व्यक्तींना पकडण्यासाठी विशेष कार्य अधिकाऱ्यांची नेमणूक करणे. विद्यूत पुरवठा अखंडीत राहण्यासाठी  पूर्ण वेळ कर्मचारी उपस्थित राहणे. चालू असलेली रस्त्यांची कामे सुरु असलेल्या ठिकाणांचा आढावा घेणे. यात्रेकरुच्या सोयीसाठी ठिकठिकाणी पाणपोईची व्यवस्था करुन स्वच्छ व चांगले पाणी देणे, मंदीर परिसरात अतिक्रमीत दुकानांना पायबंद घालणे, प्रत्येक दुकानदारांकडे कचरापेटी आवश्यक असणे.  गुत्तेदारांना बोलावून पार्कींगचा विभाग ठरवून देऊन वाहतूक व पार्कींग व्यवस्था चोख राहील यासाठी विशेष लक्ष देणे. आरोग्य विषयक सेवा पुरविणे. मंदीरातील शिस्त पालनाबाबत विशेष लक्ष देणे. पुजाऱ्यांनी ओळखपत्र लावणे. परिवहन मंडळाने बसस्टँडच्या आवारातील संशयित नागरिकांची माहिती पोलीसांना देणे आदि विषयांवर सविस्तर चर्चा करुन संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या. 
           जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी नवरात्र महोत्सवात सर्व यंत्रणा व पुजारी मंडळ अदिंनी  चोख कार्य केल्याबद्दल त्यांचे त्यांनी कौतूक करुन चैत्र पोर्णिमा यात्रेतही अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त करुन देवीच्या दर्शनाला आलेला प्रत्येक यात्रेकरु आपल्या केंद्रबिंदू मानून त्याला मंदीर संस्थान व विविध विभागांच्या वतीने चांगल्या सेवा उपलब्ध करुन द्याव्यात,असेही  त्यांनी सांगितले.

 
Top