उस्मानाबाद -   तुळजाभवानी देवीची धाकटी बहिण म्हणून नावलौकीक असलेल्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीची यात्रा शनिवारपासून सुरु झाली असून ती पाच दिवस म्हणजे दि.9 एप्रिल, 2015 पर्यंत चालणार आहे. या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक येत असून त्यांनी आज अभूतपूर्व गर्दी केली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्ट व जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागांकडून जय्यत तयारी केली आहे. भाविक तुळजाभवानी मातेचे दर्शन करुन परतीच्या प्रवासात येडेश्वरीच्या दर्शनाला येतात. या यात्रेकरुकडून देवीची वाजत गाजत पूजा केली जाते. येथील वातावरण भक्तीमय झाले असून ग्रामपंचायत ट्रस्ट मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजनही या यात्रा काळात करण्यात आले आहे.   
          आज दि.4 रोजी चैत्र पोर्णिमा महापूजा,छबिना व पालखीची मिरवणूक काढण्यात आली. दि.5 रोजी  देवीची पालखीचे सकाळी 8ते 10-30 पर्यंत आंबराईकडे प्रस्थान होऊन अमराई मंदीरात मुक्कामी असते. दि.6 रोजी एप्रिल रोजी पशुप्रदर्शन, 7 रोजी दुपारी 4 ते रात्री 8-30 या वेळेत कुस्ती फड, सांस्कृतिक कार्यक्रम, आराधी गाणी व इतर कार्यक्रम  व 8 तारखेला  9 वाजता शोभेची दारुची अतिषबाजी तर 9 तारखेला 4 वाजता घुगरी महाप्रसाद व आंबराईतून पालखीचे मंदीराकडे प्रस्थान होईल. 
       तात्पूरते हॉटेल परवाने जागेवर देण्याची सोय केली आहे. या यात्रा काळात कायदा व सुव्यवस्था आबाधीत रहावी यासाठी विविध पथकांची  नियुक्ती करण्यात आली आहे. यात्रेकरुंच्या सोयीसाठी व मनोरंजनासाठी विविधि स्टॉल लावण्यात आले आहेत. 
         यात्रेकरुंची गैरसोय होऊ नये,यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. औरंगाबाद -सोलापूर,विजापूर यामार्गे ये-जा करणाऱ्या एस.टी बसेस,जीप,कार अशी वाहने सरमकुंडी फाटा, भूम,बार्शी, सोलापूर मार्गे जातील. औरंगाबाद -उस्मानाबाद -सोलापूर या मार्गावरील वाहने इंदापूर गाव-परतापूर फाटा-येडशी या मार्गे जातील, जड व माल वाहतूक करणारी औरंगाबाद -हैद्राबाद या मार्गवर ये-जा करणारी वाहने मांजरसुंबा, केज, कळंब, ढोकी चौरस्ता, आळणी फाटा या मार्ग किंवा औसा, किल्लारी,उमरगा चौरस्ता या मार्गेही जाऊ शकतील. या बदलातून सर्व शासकीय वाहने, महत्वाच्या अतिमहत्वाच्या व्यक्तींचे वाहने तसेच अत्यावश्यक सेवांसाठीच्या वाहनांना वगळण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. 

 
Top