उस्मानाबाद - समाज परिवर्तनासाठी महापुरुषांचे चरित्र वाचणे गरजेचे असून त्यांनी केलेल्या महान कार्याचे अनुकरण करावे. थोर महापुरूषांचे विचार जीवनात आत्मसात केल्‍यास समाज परिवर्तन होऊ शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले. 
  उस्‍मानाबाद येथील जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव सभागृहात भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 व्या जयंती निमित्त दि.8  ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे उदघाटन डॉ.नारनवरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धीरज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, उपाध्यक्ष सुधाकर गुंड, प्रा. एम.आर.कांबळे, जि.प. समाज कल्याण सभापती हरिष डावरे, अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी बी. एन. उबाळे, समाज कल्याणचे  सहायक आयुक्त  एस. के. मिनगिरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
         डॉ. नारनवरे म्हणाले की, सामाजिकदृष्टया मागास यांचा विकास करावा. या समाजामध्ये गरीबीमुळे शिक्षण झाले नाही असे म्हणतात, पण गरीब माणूस कधीही शिक्षणापासून वंचित राहत नाही, याचे ज्वलंत उदाहरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. प्रत्येक व्यक्तींच्या अंगी मी यशस्वी होणार अशी इच्छाशक्ती असल्यास त्या व्यक्तींला त्यांच्या भावी वाटचालीपासून कुणी रोखू शकत नाही. बाबासाहेबांनी समाज परिवर्तनासाठी अहोरात्र प्रयत्न करुन एक चांगला व सुशिक्षीत समाज घडावा, यासाठी प्रयत्न केले. जातीभेदाला थारा न देता माणूस म्हणून प्रत्येकांना वागणूक दिली पाहिजे. सामाजीक समता व बंधुभाव निर्माण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तींनी प्रयत्न केल्यास समाज परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही, असेही डॉ.नारनवरे यांनी सांगितले. प्रा.कांबळे म्हणाले की, संविधान समितीचा मसूदा तयार करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अथक प्रयत्न करावे लागले. वर्ण व्यवस्था व जाती व्यवस्था बदलली तर सर्वांगीण विकास होतो. वंचित शोषित समाजांचे हित सुरक्षित ठेवावयाचे असेल तर लोकशाही सुरक्षित ठेवली पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधींनी संविधान समजून सकारात्मक कार्य करणे आवश्यक आहे. या माध्यमातून सामाजिक ममत्व उभे राहण्यास मदत होऊ शकते. यामध्ये युपीएससी, एमपीएससी या सव्हिल सर्व्हिसेस संविधानाने निर्माण केल्यामुळे अनेकांना उच्च पदस्थ अधिकारी होण्याची संधी प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जि. प. अध्यक्ष धीरज पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजीक समता व एकता जोपासले. त्यांनी अनुसरलेल्या कार्याचा आदर्श ठेवून त्यांचे विचार या निमित्ताने सर्वांनी अंगीकारावे, असे सांगून सप्ताह आयोजनाबाबत शुभेच्छा दिल्या तर श्री. डावरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समता व बंधुभाव निर्माण करण्याचे कार्य केले त्यांचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्यन करावा, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे संविधान वाचनाने झाली. प्रास्ताविक  मिनगिरे यांनी तर आभार समाज कल्याण अधिकारी अमित घवले यांनी मानले. सूत्रसंचालन रमाकांत गायकवाड यांनी केले.

 
Top