उस्मानाबाद - उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या सैन्यभरती मेळाव्यात आज (गुरुवारी) लातूर जिल्ह्यातील उमेदवारांची शारिरिक पात्रता चाचणी  घेण्यात आली. लातूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेल्या युवकांनी या सैन्य भरती मेळाव्यात सहभाग घेतला. ही सैन्य भरती प्रक्रिया उस्मानाबादसह लातूर, बीड, अहमदनगर, पुणे या पाच जिल्ह्यांसाठी  पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घेण्यात येत आहे. सैन्य दलातील भरती प्रक्रियेचे अधिकारी, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, सैनिक कार्यालय आदिसह विविध यंत्रणांनी येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये, यासाठी चोख व्यवस्था केली आहे.  
दि. 10 एप्रिल रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, उमरगा, लोहारा आणि तुळजापूर तर दि. 11 एप्रिल रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, वाशी, भूम आणि परंडा तालुक्यातील युवकांसाठी भरती प्रक्रिया होणार असून या जिल्ह्यातील युवकांनी या सैन्य भरतीचा लाभ घेण्याचेही आवाहन सैन्य भरती बोर्डाकडून करण्यात आले आहे.  
पहिल्या दिवशी पुणे जिल्ह्यातून 2500 युवकांनी भरतीसाठी हजेरी लावली होती. त्यातील सुमारे 850 युवक शारिरिक पात्रतेत पात्र ठरले. जवान (जनरल ड्युटी), जवान (तांत्रिक), जवान (क्लर्क/एसकेटी), जवान (नर्सिंग असिस्टंट) आणि जवान (ट्रेडसमन) या पदांसाठी ही सैन्य भरती होत आहे.  अतिशय पारदर्शकपणे ही भरती प्रकिया होत असून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल ऑफिसर प्रभोदय मुळे, सहायक डी.जी.वाघमारे यांनी या सैन्य भरती मेळाव्यास वेळोवेळी भेटी देऊन पाहणी केल्याची माहिती भरती ऑफिसर (सेना मेडल)कॅनल विक्रम दुबे यांनी दिली.
या भरती मेळाव्यास 15 ऑफिसर, 22 ज्युनिअर ऑफिसर अधिकारी, अहमदनगर व पुणे येथून आलेले 100 जवानांमार्फत ही भरती प्रक्रिया सुरु असल्याचेही श्री. दुबे यांनी सांगितले. 
भरतीसाठी आलेल्या युवकांसाठी नि:शुल्‍क पाणी पिण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, उमेदवारांच्या सुविधेसाठी संगणक व्यवस्था, शारीरिक पात्रता चाचणीवेळी दुर्देवाने उमेदवारांना काही झाल्या तात्काळ प्रथमोपचार  मिळण्यासाठीची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. . जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने या भरती मेळाव्यास विशेष महत्व देऊन पुरेसा व कडक बंदोबस्त ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.
भरती प्रक्रिया पारदर्शीपणे होत असून कोणी नौकरीचे अमिष दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असल्यास अशा आमीषाला बळी पडू नये आणि  संबंधितांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कर्नल विक्रम दुबे यांनी केले आहे. 
दि. 12 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील उमेदवारांसाठी अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता आणि राहुरी तर दि. 13 एप्रिल रोजी नेवासा, श्रीरामपूर, अहमदनगर, पारनेर आणि शेवगाव, दि. 14 एप्रिल रोजी पाथर्डी, कर्जत, जामखेड आणि श्रीगोंदा या तालुक्यातील युवकांसाठी सैन्य भरती प्रक्रिया होईल. दिनांक 15 एप्रिल रोजी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, माजलगाव, वडवणी आणि धारुर तर दि. 16 एप्रिल रोजी केज, परळी, बीड आणि आष्टी तालुक्यातील युवकांसाठी सैन्य भरती होईल. दि. 17 एप्रिल रोजी बीड जिल्ह्यातील पाटोदा, शिरुर कासार आणि गेवराई तालुक्यासाठीची सैन्य भरती प्रक्रिया होईल. 
दि. 18 एप्रिल रोजी  सेवारत सैनिक, माजी सैनिकांचे पाल्य, युद्ध विधवांचे पाल्य आदींच्या साठी सैन्य भरती प्रक्रिया होईल.दि. 19 एप्रिल रोजी वैद्यकीय तपासणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. 
सैन्यभरतीसाठी जवान (जनरल ड्युटी) या पदासाठी वय साडेसतरा ते 21 वर्षे दरम्यान असावे, दहावी इयत्ता किमान 45 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण असावा, शारिरीक क्षमता- उंची 168 सेंमी, वजन 50 किलो आणि  छाती  77 सेंमी (फुगवून 5 सेंमी जास्त) असावी. 
जवान (तांत्रिक) या पदासाठी वय साडेसतरा ते 23 वर्षे दरम्यान असावे, बारावी (विज्ञान) इयत्ता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी घेऊन उत्तीर्ण असावा, शारिरीक क्षमता- उंची 167 सेंमी, वजन 50 किलो आणि  छाती  76 सेंमी (फुगवून 5 सेंमी जास्त) असावी.
जवान (क्लर्क/एसकेटी) पदासाठी वय साडेसतरा ते 23 वर्षे दरम्यान असावे, बारावी इयत्ता (कला/विज्ञान/वाणिज्य) किमान 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण असावा आणि प्रत्येक विषयात किमान 40 टक्के गुण आवश्यक, इंग्रजी आणि गणित/अकाउंट/बुक कीपिंग हे विषय 10 वी आणि बारावीतही अभ्यासलेले असावेत आणि दोन्हीत किमान 40 टक्के गुण असावेत.  शारिरीक क्षमता- उंची 162 सेंमी, वजन 50 किलो आणि  छाती  77 सेंमी (फुगवून 5 सेंमी जास्त) असावी.
जवान (नर्सिंग असिस्टंट) पदासाठी वय साडेसतरा ते 23 वर्षे दरम्यान असावे, बारावी (विज्ञान) इयत्ता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी घेऊन किमान 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण असावा,  शारिरीक क्षमता- उंची 167 सेंमी, वजन 50 किलो आणि  छाती  77 सेंमी (फुगवून 5 सेंमी जास्त) असावी.   
जवान (ट्रेडसमन) पदासाठी वय साडेसतरा ते 23 वर्षे दरम्यान असावे, दहावी अथवा आठवी  इयत्ता उत्तीर्ण असावा, शारिरीक क्षमता- उंची 168 सेंमी, वजन 48 किलो आणि  छाती  76 सेंमी (फुगवून 5 सेंमी जास्त) असावी. 
सैन्य भरती मेळाव्यासाठी येताना उमेदवारांनी  स्वताचे पासपोर्ट आकाराचे 16 छायाचित्रांच्या प्रती, मुळ प्रमाणपत्ररे इयत्ता 10 वी  व 12 वीची टी सी /सनद व मार्कमेमो व छायांकीत प्रतीचा संच, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला (खुल्या प्रवर्गासाठी सरपंच व पोलीस पाटलांचा दाखला तर राखीव जागांसाठी संबंधित प्राधिकाऱ्याने दिलेला दाखला), चारित्र्य अहवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, तसेच एनसीसी आणि क्रीडाविषयक कौशल्याचे प्रमाणपत्र यांच्या मुळ प्रती एका झेरॉक्स सेटसह आणणे अत्यावश्यक राहील,असेही कळविण्यात आले आहे.                  

 
Top