बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) बार्शी तालुक्यातील  रास्त भाव धान्य दुकानदारांनी जादा धान्याची उचल करुन परस्पर विल्हेवाट लावल्याचे सन २००९ मध्ये सामाजिक कार्यकर्ते एल.बी.शेख यांच्या तक्रारीनंतर पुढे आले. सदरच्या प्रकारणाची चौकशी करुन दोषी आढळलेल्या तालुक्यातील ६८ रास्त भाव धान्य दुकानांचे परवाने निलंबीत करण्यात आले होते. त्यापैकी दोन दुकानांकडून ७ लाख १९ हजार ४४२ रुपये वसूल करण्याचे फेर आदेश न्यायालय व उपआयुक्त यांच्या आदेशानंतर काढण्यात आले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते एल.बी.शेख यांच्या तक्रारीची दखल घेऊन केलेल्या कारवाईत हॉटेल मालक सहकारी ग्राहक संस्था रास्तभाव धान्य दुकान क्र.२४/२ यांनी जानेवारी २००८ ते मार्च २००९ या कालावधीत जादा उचल बीपीएल व अंत्योदय गहू एकूण २०६.२३ क्विंटल, बीपीएल व अंत्योदय तांदूळ एकूण ७२.४३ क्विंटल जादा उचल केली असल्याने त्याची बाजारभावाने होणारी रक्कम ५ लाख १६ हजार ७४ वसूल करुन शासकिय खजिन्यात जमा करावी आणि आदेशाची नोंद मुळ प्राधिकारपत्रावर घ्यावी असे आदेश देण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे हॉटेल मालक सहकारी ग्राहक संस्था रास्तभाव धान्य दुकान क्र.२४/२ यांचेकडून ५ लाख १६ हजार ७४ आणि चेअरमन शरद फलोत्पादन सहकारी संस्था रास्त भाव धान्य दुकान क्र.६ यांचेकडून २ लाख ३ हजार ३६८ रुपये वसूल करुन शासकिय खजिन्यात जमा करावी आणि आदेशाची नोंद मुळ प्राधिकारपत्रावर घ्यावी असे आदेश देण्यात आले आहेत.
सन २००९ मध्ये एल.बी.शेख यांच्या तक्रारीनंतर मा.सचिव अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांनी चौकशी व तपासणी करुन त्वरीत कारवाई करणेबाबतचे आदेश दिले. सदरच्या दुकानांची चौकशी करण्यासाठी पुरवठा निरीक्षक अधिकारी ए.डी.पुजारी, यांच्या नियंत्रणाखाली पथक नेमण्यात आले. तहसिलदार बार्शी यांना दुकानांची तपासणी करण्यास कळविण्यात आले परंतु बार्शी तहसिलने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने व प्रकरणाची तपासणी न केलयने गोदाम अभिलेख व कार्यालयीन अभिलेख तपासणीसाठी लेखा पर्यवेक्षक श्री आल्हाट व  बागवान यांची नेमणूक करुन तपासणी केली. परवानाधारकांनी जादा धान्य उचलल्याचे दिसून आल्यानंतर त्याचा अहवाल पाठविण्यात आला. त्यानुसार परवानाधारक यांचेकडून धान्याची रक्कम वसूल करुन दुकानाची संपूर्ण अनामत रक्कम जप्त करुन परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले होते. परवानाधारकांनी त्या आदेशाविरुध्द उपआयुक्त यांच्याकडे पुनरिक्षण करण्यासाठी अपिल केले. त्यावर पुनरिक्षण अर्ज मंजूर करुन फेरचौकशीचे आदेश देण्यात आले. त्याविरोधात तक्रारदार यांनी न्यायालयात धाव घेतली, न्यायालयाने तक्रारदार यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्याचे आदेश दिले. त्यानंतर उपआयुक्त यांच्या आदेशानुसार दुकानाच्या दफ्तरांची फेरतपासणी करण्यासा सांगीतले. सांगोला तहसिलदार यांना याकामी नेमण्यात आले यामध्ये दफ्तर तपासणीसाठी उपलब्ध नाही, आर. २ विवरणपत्र पाहणेस उपलब्ध नाही त्यामुळे गोदामात धान्य शिल्लक होते किंवा नाही याची खात्री करता येत नाही. आर २ विवरणपत्र पाहता त्यामध्ये पेंडींग डिलेव्हरी असल्याने दिसून येते, तपासणीवेळी अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिका उपलब्ध न झाल्याने धान्याच्या नोंदीची पडताळणी करता आली नसल्याचे कळविण्यात आले. परवानाधारक यांनी दुकानात दोष, तक्रार नसल्याचे, जादा धान्य उचल केली नसल्याचे तसेच गोडाऊनमध्ये धान्य शिल्लक नसल्याने पुढील महिन्यात चलन पास करुन दोन महिन्याचे धान्य केल्याचे म्हणणे दिले. तक्रारदार यांनी धान्य वजा करुन राहिलेल्या धान्याची नोंद परमीटच्या पाठीमागे नसल्याचे पुरावे सादर केले. तसेच एकाच परमीटवर तीनवेळा धान्य उचलण्यात आल्याचे म्हटले, उन्हाळे समितीने सन २००८ साली केलेल्या अहवालात बार्शी शहर व तालुक्यातील धान्य केरोसिन परवानाधारकांनी आपल्या रजिस्टरमध्ये बोगस नावे नोंदवून त्यावरील धान्य, केरोसिन व इतर वस्तू उचलून त्याची विल्हेवाट लावून जास्त नफा कमवून शासनास अब्जावधी रुपयांस फसविले असल्याने अपहारित रक्कम वसूल करण्याचे आदेश करावे व शासनाचे होणारे नुकसान भरुन काढावे आणि परवानाधारकांवर गुन्हे दाखल करावे असे म्हटले होते.

 
Top