उस्मानाबाद -: विज्ञान निष्ठा, विवेकी समाज निर्माण करण्यासाठी संत महंतांचे योगदान मोठे आहे. त्या परिवर्तनाच्या लढाईत युवकांचा सहभाग वाढावा यासाठी अंनिसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा संवाद शिबीरास मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील यशश्री क्लासेसच्या सभागृहात शनिवारी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या शिबीरास जिल्हाभरातील युवक उपस्थित होते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने राज्यभरात युवा संवाद शिबीराचे आयोजन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात या शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. उस्मानाबाद शाखेच्यावतीने शनिवारी हे शिबीर घेण्यात आले. निकोप आणि सामाजिकदृष्ट्या पुरक चळवळीमध्ये युवा सहभाग वाढावा यासाठी व उपक्रम राबविला जात आहे. कोल्हापूर येथील अंनिसचे राज्य युवा सचिव कृष्णात कोरे, वाघेश साळुंके आणि जिल्हा कार्याध्यक्ष किरण सगर यांनी शिबीरात सहभागी युवकांना मार्गदर्शन केले.
तिन सत्रात दिवसभर चाललेल्या या शिबीरात प्रारंभी समाजातील विविध प्रश्‍नांचे युवकांना असलेले आकलन, प्रश्‍न समजुन घेण्याची तयारी, त्या प्रश्‍नांना भिडण्यासाठी आवश्यक असलेला अभ्यास या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर युवकांच्या अंनिसकडून असलेल्या अपेक्षा, अंनिसच्या कामाची पद्धत, याबाबत प्रश्‍नोत्तराच्या स्वरूपात चर्चा झाली आणि शेवटी युवकांनी पुढील काळात निर्माण होणार्‍या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी कोणत्या पद्धतीने सहभाग वाढवायला हवा, सोशल मिडीयाचा वापर परिवर्तनाच्या लढाईत अधिक चपखलपणे विधायकरित्या कसा करता येईल. महामानवांचे विचार समाजातील प्रत्येक स्तरात पोहंचविण्यासाठी कोणते कृती कार्यक्रम आखायचे यावर साधक बाधक चर्चा झाली.
यावेळी यशश्री क्लासेसचे संचालक रवि निंबाळकर, राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष देविदास वडगावकर, अब्दुल लतिङ्ग, गीता सानप, अंनिसच्या जिल्हाध्यक्ष शैलजा भस्मे, प्रा. अवंती सगर यांच्यासह जिल्ह्यातील अंनिसच्या विविध शाखांचे पदाधिकारी, तरूण तरूणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन उस्मानाबाद शाखेच्या कार्याध्यक्ष भाग्यश्री केसकर यांनी तर शेवटी आभार प्रा. सुधिर कांबळे यांनी मानले.
 
Top