बार्शी -  बार्शी नगरपरिषदेवर राष्ट्रवादीच्या आमदार दिलीप सोपल यांची सत्ता आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील सार्वजनिक कामे वेळेत होत नसल्याने तसेच त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक होत असल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकार्‍यांवर आंदोलनाची वेळ आली आहे. अनेक दिवसांपासून बार्शी जामगाव रस्त्यावरील तेलगिरणी चौक येथे गटारांची व्यवस्था करण्याची मागणी असतांनाही त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळेझाक केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने ६ जून रोजी रास्तारोको आंदोलानाचा लेखी पत्राद्वारे इशारा देण्यात आला आहे.
शहरातून जाणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर शासकिय विश्रामगृह ते तेलगिरणी चौक दोन्ही बाजूने सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या गटारांचे पाणी नैसर्गिक उताराने शिवाजी आखाडा मार्गे फौजदार चावडीच्या पिछाडीतून असलेल्या नाल्यात जाणे गरजेचे आहे. परंतु ते तेलगिरणी चौकातून ऐनापूर मारुती मंदिराकडे जाणार्‍या मुळ गावठाणातील जुन्या व अरुंद गटारांना जोडण्यात आले आहे. सदरच्या त्रुटीमुळे दरवर्षी पावसाळ्यांच्या दिवसांत तेलगिरणी चौक ते ऐनापूर मारुती मार्गावरील खुरपे बोळ, कुंभार बोळ, धारुरकर बोळ, चंद्रशेखर बोळ, पानागावकर बोळ, टाकणखार रोड आदी वस्त्यांमध्ये तसेच व्यापार्‍यांच्या घरे आणि दुकानांत पाणी शिरते. यामुळे नगरपरिषदेने दुरुस्ती केलेल्या रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याबाबत अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली आहे. आमदार दिलीप सोपल यांच्या पत्राद्वारेही ही बाब निदर्शनास आणून दिलेली असतांना कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने शनिवारी दि. ६ जून रोजी ११ वाजता तेलगिरणी चौक, शिवाजी आखाडा परिसरातील नागरिकांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे लेखी कळविण्यात आले आहे. या निवेदनावर नगरसेविका निर्मला स्वामी, नगरसेवक देवीदास शेटे, गणेश जाधव, नागेश अक्कलकोटे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 
Top