पांगरी (गणेश गोडसे) :- विजांचा कडकडाटासह झालेल्या परतीच्या पावसात पांगरी भागात विविध ठिकाणी विज पडून चुलती, पुतण्यासह दोन ठार होऊन अठरा शेळ्या,एक म्हैस मृत तर एक जखमी झाल्याची घटना आज रविवार दि. 4 ऑक्‍टोबर रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास पांगरी-कारी मार्गावरील माळावर घडली.
सिमा तुळसीदास माळी (वय 40) व अनिकेत विश्वनाथ माळी (वय 12, दोघेही रा.पांगरी) अशी विज पडून मयत झालेल्याची नांवे आहेत. पांगरी,घोळवेवाडी,वाणेवाडी येथील तिन शेतक-यांच्या मिळून 18 शेळ्या विज पडून ठार झाल्या तर पांगरी येथील शिक्षक कॉलनित घरावर विज पडून एक जखमी झाले॰
  विश्वनाथ रामा माळी यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की,ते शेतातील सोयाबीन काढत असताना अचानक ढग दाटून येऊन विजेच्या कडकडाटासह पावसाला  सुरुवात झाली.त्यामुळे विश्वनाथ माळी,त्यांची पत्नी स्वाती,मुलगा अनिकेत,भावजय सिमा,पुतण्या गणेश व भाऊ तुळसीदास असे सर्वजण मिळून शेळ्या बांधण्याच्या गोठ्यात जावून बसले असता अचानक गोठ्यावर विज पडली.त्यात भाजून अनिकेत  व सिमा हे दोघे गंभीर जखमी झाले.तसेच त्यांच्या तिन शेळ्या ठार झाल्या.जखमींना उपचारासाठी पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ.मुंदडा यांनी त्यांना मृत घोषित केले.
   दुसर्‍या घटनेत वाणेवाडी येथील पोपट लक्ष्मण काटे हे त्यांच्या शेळ्या घेऊन भोयरे शिवारात चरण्यासाठी घेऊन गेले असता त्यांच्या दहा शेळ्यावर विज पडून त्यांचे एक लाख विस हजार रुपयांचे नुकसान झाले.दुसर्‍या घटनेत घोळवेवाडी शिवारात अर्जुन आश्रुबा चौरे यांच्या मालकीच्या पाच शेळ्या विज पडून मयत झाल्या.पांगरी येथील शिक्षक कॉलनित सुरेश (बंडू)धावणे यांच्या राहत्या घरावर विज पडून त्यात सुरेश धावणे हे जखमी होऊन त्यांच्या घरातील इलेक्ट्रिक साहित्य जळून व घराचे नुकसान झाले आहे.पांगरी येथील बाळू चाँद कोतवाल यांची म्हैस विज पडून ठार झाली आहे॰ पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रथमच ओढ्यास पाणी आल्यामुळे जखमींना मदत करताना अडचणी निर्माण होऊन 108 रुग्णवाहिका अलीकडेच थाबवण्यात आली.नुकतेच दोन दिवसापूर्वी पांगरी येथील एक व घोळवेवाडी येथील पती-पत्नी विज घासून गेल्यामुळे भाजून जखमी झाले होते.
पांगरी येथे शव विछेदणासाठी  वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे बार्शी येथून अधिकारी मागवण्यात आला.त्यामुळे ग्रामस्थ,नातेवाईक यांना ताटकळत बसावे लागल्यामुळे यांच्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
 
Top