तुळजापूर :- महाराष्‍ट्राची कुलस्‍वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्‍या मंचकी निद्रेस आज रविवार दि. ४ ऑक्‍टोबर रोजी सायंकाळपासून प्रारंभ होत आहे.
         देशभरातील लाखो भाविकांचे श्रध्‍दास्‍थान असलेल्‍या श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्‍सव दि. १३ ऑक्‍टोबरपासून सुरु होत आहे. त्‍याअगोदर आज रविवार रोजी सायंकाळी आठ वाजण्‍याच्‍या सुमारास श्री तुळजाभवानी मातेच्‍या मंचकी निद्रेस प्रारंभ होणार आहे.
       श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती 'चलदेवता' म्‍हणून ओळखली जाते. देशात कोठेही सिंहासनावरील स्‍थापित मूर्ती हलवून पलंगावर निद्रीस्‍त केली जात नाही. मात्र, तुळजापुरातील देवीची मुर्ती वर्षातून तीनवेळा सिंहासनावरुन हलवून पलंगावर निद्रीस्‍त करण्‍यात येते. 
      मातेच्‍या निद्राकाळात मुर्तीला पंचामृत अभिषेकाऐवजी सुगंधी तेल लावण्‍याची प्रथा प्र‍चलित आहे. पितृ पंधरवड्यातील अष्‍टमीला सुरु होणारी मातेची मोह निद्रा अश्विन शुध्‍द प्रतिपदेच्‍या पहाटेपर्यंत चालणार आहे. नऊ निद्रा पूर्ण करुन दहाव्‍या दिवशी मातेची मुख्‍य मुर्ती चांदीच्‍या सिंहासनावर पुनप्रतिष्‍ठापित केली जाईल. शारदीय नवरात्र महोत्‍सवापूर्वीची विश्रांती म्‍हणून देवीच्‍या या निद्रेला अनन्‍यसाधारण महत्‍त्‍व आहे. 
 
Top