उस्मानाबाद -: राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. पिण्याचे पाणी, जनावरांना चार, हाताला काम आणि चारा छावण्यांबाबतची वस्तुस्थिती त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून जाणून घेतली. तसेच भडाचीवाडी, खामगाव,  मस्सा (खं), हावरगाव, ईटकूर या गावांना भेटी देऊन तेथील पीकपरिस्थितीचीही त्यांनी पाहणी केली.
       पालकमंत्री डॉ. सावंत यांनी शनिवारी सकाळी जिल्हा प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील सर्वच विधानसभा सदस्य सर्वश्री मधुकरराव चव्हाण, राणाजगजीतसिंह पाटील, राहूल मोटे आणि ज्ञानराज चौगुले, तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. 
    पालकमंत्री डॉ. सावंत यांनी जिल्ह्यात सध्या पाण्याची उपलब्धता किती आहे, हे पाणी किती दिवस पुरेल, तसेच आगामी काळासाठी संभाव्य टंचाई आराखड्यानुसार पाणी कुठून उपलब्ध होऊ शकेल, त्यासाठीची व्यवस्था काय, आदींची माहिती घेतली. आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. याशिवाय, राष्ट्रीय पेयजल योजना, भारत निर्माण, जलस्वराज्य आदी योजनांतील जी कामे गैरव्यवहारांमुळे ठप्प झाली, त्याप्रकरणी संबंधीतांवर ठपका ठेऊन कार्यवाही करण्याचे आणि या प्रकरणी 1 महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत किती गावे समाविष्ट आहेत, याचीही माहिती घेतली.
    सध्या चारा छावण्यांची संख्या किती आहे, प्रस्ताव किती आले आहेत, याचीही त्यांनी माहिती घेतली. तसेच विविध लोकप्रतिनिधींनी जनावरांच्या संख्येबाबतच्या अटींसंदर्भात विचारणा केली असता यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांकडे विषय मांडण्यात येऊन निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, टंचाई परिस्थिती लक्षात घेता ज्या ठिकाणाहून टॅंकरचे प्रस्ताव येतील, ते तपासून 3 दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देशही डॉ. सावंत यांनी दिले. 
       रोजगार हमी योजनेत मजुरांची संख्या वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. अधिकाधिक कामे हाती घेऊन मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करुन द्या, ज्याठिकाणी मागणी आहे, तेथे तात्काळ कार्यवाही करा, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी यावेळी प्रशासनामार्फत कामावर या अभियान सुरु असल्याचे सांगितले. अधिकाधिक मजुरांना कामांवर येण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. यासंदर्भात भूममध्ये नुकतीच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सहायक तांत्रिक अधिकारी, ग्रामस्वरोजगार सेवक यांची कार्यशाळा घेऊन त्यांना प्रेरित करण्यात आले असल्याचे सांगितले. सध्या मजुरसंख्या 10 हजारांवर गेली असून ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. 
     यानंतर पालकमंत्री डॉ. सावंत यांनी अन्न सुरक्षा योजनेचाही आढावा घेतला. सर्वांना या योजनेंतर्गत धान्य मिळतेय की नाही, याची खातरजमा करा.कोणाचीही तक्रार येता कामा नये, असे त्यांनी सांगितले. 
     त्यानंतर पालकमंत्री डॉ. सावंत यांनी टंचाईग्रस्त विविध भागांना भेटी देऊन तेथील शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे हेही यावेळी त्यांच्यासोबत होते. त्यांनी भडाचीवाडी येथे पीकपरिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी खामगाव येथे जनावरांच्या छावणीला भेट देऊन पाहणी केली. तेथे त्यांनी जनावरांच्या छावणीतील व्यवस्था, त्यांना देण्यात येणाऱ्या पशुखाद्याविषयीची माहिती घेतली. यावेळी तेथील पशुपालकांच्या आरोग्य तपासणीसाठी उभारण्यात आलेल्या आरोग्य कक्षासही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. 
      डॉ. सावंत यांनी त्यानंतर मस्सा खंडेश्वरी येथे विहीरीच्या कामाची तसेच फळबागेची पाहणी केली. ठिकठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. हावरगाव रस्त्यावर त्यांची वाट पाहात असलेल्या शेतकऱ्यांना पाहून त्यांनी गाडी थांबवली आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी ईटकूर शिवारातील शेतीला भेट दिली. तेथील पीकपरिस्थितीची पाहणी करुन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही त्यांनी भेट दिली.

 
Top