नळदुर्ग :-  बंजारा (लमाण), दलित समाजातील विस्थापित झालेल्या कुटूंबांना त्यांच्या मुळ जागेवरच म्हणजे सर्व्हे नं. 29 मध्ये पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने शहर विकास आराखडयातील वीस वर्षापूर्वी आरक्षित केलेले आरक्षण रद्द करण्यासाठी नळदुर्ग नगपालिकेच्या नगराध्यक्षांनी विशेष सभा बोलावण्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे असे मिळून 16 नगरसेवकांनी दि. 28 मार्च रोजी नगराध्यक्षा सौ. मुनवर सुलताना कुरेशी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
नळदुर्ग नगरपालिकेने डिसेंबर महिन्यात शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये अक्कलकोट रोड सर्व्हे नं. 29 मधील राहत असलेली बंजारा (लमाण), दलित वस्तीचे घरे काढून टाकण्यात आली. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या जागेवरती भाजी मंडईचे आरक्षण पडलेले आहे. परंतु हे आरक्षण पडून जवळपास 15 ते 20 वर्षे पूर्ण झालेली आहेत. तरी अदयापपर्यंत त्या जागेवर कसल्याही प्रकारचे भाजी मंडई विकसित करण्यासाठीचे प्रयत्न झालेले नाहीत. परंतु याच जागेवर गेल्या पन्नास वर्षापासून लमाण वस्ती वास्तव्यास असून त्यातील कुटूंब प्रमुखांनी शासन दरबारी हे आरक्षण उठविण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न केले. पण ते निष्फळ ठरले.

तरी आज त्या उघडयावर पडलेल्या कुटूंबियांना त्यांच्या मुळ जागेवरच बसविण्यासाठी त्या जागेवरील असलेले आरक्षण रदद करण्यासाठीचे प्रयत्न आपण केले पाहिजेत. त्यासाठी आम्ही खालील सहया करणारे सर्व न.प. सदस्य आपणास वरील विषयास अनुसरुन आपण तात्काळ तीन दिवसात विशेष सभा बोलविण्यात यावे व त्यावर चर्चा होवून निर्णय घेण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन डुकरे, दयानंद बनसोडे, निरंजन राठोड, संजय बताले, नगरसेविका निर्मलाताई गायकवाड, सुफिया कुरेशी, सुमन जाधव, शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर चव्हाण, काँग्रेसच्या उपनगराध्यक्षा लक्ष्मी खारवे, नगरसेवक शहबाज काझी, शब्बीरअली सय्यद सावकार, इमाम शेख, नगरसेविका सुप्रिया पुराणिक, मंगलताई सुरवसे, कुशावर्ती शिरगुरे, अपर्णाताई बेडगे या 16 नगरसेवकांच्या स्वाक्ष-या आहेत.
 
Top