नळदुर्ग  :- देशात बहुसंख्येने असलेला भटक्या विमुक्त जाती जमाती समूहातील माणूस गेल्या अनेक वर्ष मुलभूत गरजा व सामाजिक न्याय हक्कापासून वंचित राहिल्यामुळे त्यांची अपेक्षित उन्नती होवू शकली नाही. तेंव्हा अशा वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेत त्यांना आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणार असल्याचे मत राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकुजी इदाते यांनी व्यक्त केले.  
अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचा चौथा वर्धापन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्ताने शहापूर (ता. तुळजापूर) येथे भटक्या विमुक्तांचा मेळावा व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा शनिवार दि. 9 एप्रिल रोजी संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटनाप्रसंगी इदाते हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य कैलासराव शिंदे तर राजेंद्र वनारसे, नगरसेवक दिलीप धोत्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकास महामंडळाचे भगवानराव कंधारे, केंद्रीय दूरसंचारचे सदस्य विकास कवडे, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बिभीषण जाधव, डॉ. बाळासाहेब हरपळे, मराठवाडा अध्यक्ष पुनम बीडकर, बिहारचे प्रदेशाध्यक्ष विष्णू देव, ज्योती सोनवणे, ॲड. मुकूंद यदमळ, बाबा लिंगाडे, राजनसिंह चितोडिया, श्रीमती गीता परदेशी, मारुती बनसोडे, ह.भ.प. रमाकांत भोसले महाराज, एस.के. गायकवाड, पत्रकार शिवाजी नाईक, शहापूरच्या सरपंच सौ. उर्मिला धोंगडे, उपसरपंच नानासाहेब पाटील, श्रावण वाघमारे आदींची उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास शिंदे यांनी सांगितले की, राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष इदाते यांच्या शिफारशीनुसार उस्मानाबाद जिल्हयातील अणदूर, कसबे तडवळे, सालेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक विकासासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयेचा निधी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रत्नागिरी जिल्हयातील अंबावडे या मूळ गावच्या विकासासाठी साडे तिनशे कोटी रुपये निधीची तरतूद करुन ती मंजूर करण्यात आल्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. जनसाथी नेटवर्कचे समन्वयक मारुती बनसोडे यांनी दलित, आदिवासी, भटक्या जाती जमातीच्या कल्याणासाठी केंद्र व राज्यस्तरावर विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी मध्य रेल्वेच्या सदस्यपदी निवड झालेले व वैदयकीय क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासत अपंगाच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने अद्वितीय कार्य केलेले पुणे येथील डॉ. बाळासाहेब हरपळे यांचा इदाते यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य बिभीषण जाधव यांनी तर सुत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले. शेवटी सर्वांचे आभार भगवानराव कंधारे यांनी मानले.

 
Top