नळदुर्ग :- माथेफिरू संबंधित अधिका-याने चुकीची कारवाई करून बुल्डोजरने घरे पाडून अनेक गरिबांना राक्षसीवृत्तीने हुस्कावून लावून बेघर केल्याप्रकरणी येत्या महिन्याभरात नगरपालिका व जिल्हा प्रशासनाने तात्काळ बेघरांचे पुनर्वसन करावे, अन्यथा एकाही अधिका-यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचे सज्जड दम वजा ईशारा देवून मनसे स्टाईलने यापूढे आंदोलन करण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी नळदुर्ग येथे रास्ता रोको आंदोलन प्रसंगी दिला. 
     नगरपालिका प्रशासनाने नळदुर्ग येथील सर्वे. नं. 29 मध्ये 50 वर्षापर्वीपासून राहणा-या नागरिकांचे राहती घरे डिसेंबर महिन्यामध्ये भुईसपाट केले, अन्याग्रस्त कुटुंबाना कसल्याही प्रकराची पूर्वसुचना किंवा नोटीस न देता, –हदारिला अडथळा न ठरणारी बंजारा (लमाण), दलित, मुस्लिम या गोरगरीब कुटुंबाच्या घरांची संपूर्ण वस्ती जेसीबीने उध्वस्त करून मोठा अन्याय केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बुधवार दि. 13 एप्रिल रोजी नळदुर्ग येथे सकाळी साडे दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नवगिरे बोलताना पूढे म्हणाले की, दि. 1 मार्च रोजी जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्वसन परिषद घेवून एक महिन्याच्या आत बेघरांचे पुनर्वसन करावे या ठरावाची अंमलबजावणी शासनाने न केल्याने त्याच्या निषेधार्थ आजचा हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगून येत्या 20 तारखेस मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जिल्हा दौ-यावर येत असून नळदुर्ग येथील बेघर कुटुंबांना भेट देणार आहेत. तेंव्हा शासनाने त्वरीत पुनर्वसनाची कारवाई करावी.  

   प्रारंभी ऐतिहासिक किल्ला गेट येथून शहरातील मुख्य बाजारपेठ, चावडी चौक मार्गे बसस्थानक समोर महामार्गावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये बेघर कुटुंब, व्यापारी मनसे कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी कडक उन्हामध्ये बेघर कुटुंब, रिपाइं, राष्ट्रवादी व मनसेचे कार्यकर्ते तब्बल एक तासापेक्षा अधिक वेळ रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सोलापूर हैद्राबाद महामार्गावरील वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. या रास्ता रोको आंदोलनास रिपपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रवादीने आपला जाहीर पाठिंबा दिला. याप्रसंगी राश्ट्रवादीचे नगरसेवक सचिन डुकरे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, नळदुर्ग शहराध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, मनसेचे जिल्हा सचिव अमरराजे कदम, परिवहन उपजिल्हाध्यक्ष बशीर शेख, शहराध्यक्ष ज्योतिबा येडगे, शहर सचिव प्रमोद कुलकर्णी आदींनी भाषण केले. यावेळी रिपाइं व मनसेच्यावतीने बेघर कुटुंबांचे मुख्याधिका-याच्या पगारातून पुनर्वसन करावे, संपूर्ण अतिक्रमण माहिमेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणीचे निवेदन नायब तहसिलदार माणिक पवार यांना देण्यात आले.  यावेळी मनसेचे अरूण जाधव, रमेश घोडके, शिरीष डुकरे, गौस कुरेशी, आलीम शेख, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, शहराध्यक्ष महादेव कांबळे, रिपाइं अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष बाशीद कुरेशी, शहराध्यक्ष बबलू कुरेशी, तलाठी तुकाराम कदम आदीजण उपस्थित होते. 
 
Top