नळदुर्ग :- शहर व परिसरातील उद्योजक, व्यापारी, शेतकरी, भाविक यांच्यासाठी नळदुर्ग येथे मध्य  रेल्वेचे तिकीट बुकिंग व आरक्षण कार्यालयासाठी केंद्रिय रेल्वे मंत्री यांना भेटून विषेश बाब म्हणून याठिकाणी लवकरच रेल्वेचे कार्यालय कार्यान्वित करण्याचे आश्वासन मध्य रेल्वे भारत सरकार नवी दिल्लीचे सदस्य बिभीषण जाधव यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.  
         एका विषेश कार्यक्रमासाठी आले असता नळदुर्ग येथील शासकीय विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बिभीषण जाधव हे बोलत होते. नळदुर्ग हे शहर मध्यवर्ती ठिकाणी असून सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे.  येथून सोलापूर 45 कि.मी, उस्मानाबाद 52 कि.मी, अक्कलकोट 32 कि.मी तर तुळजापूर 32 कि.मी आंतरावर आहे. नळदुर्ग शहराला देशभरातून पर्यटक भेटी देवून ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी सतत गर्दी करतात. त्याचबरोबर तुळजापूरच्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवून भाविक भक्त अणदूर – नळदुर्ग येथील श्री खंडोबाचे दर्शनासाठी येतात. यावेळी त्यांना नळदुर्ग येथील इतिहास प्रसिध्द किल्ला पाहण्याचा मोह होतो. या ठिकाणाहून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेवून पुढे श्रीक्षेत्र गाणगापूरकडे श्री दत्तचे दर्शनासाठी रवाना होतात. तसेच गाणगापूरहून बहुतांश भाविक नळदुर्ग मार्गे तुळजापूरकडे येणा-याची संख्या मोठी आहे. या भागातून तिरूपती बालाजी, शिर्डी देवस्थानला जाण्यासाठी रेल्वे हा एकमेव सोईचा मार्ग ठरतो.  

      नळदुर्ग हे शहरातंर्गत परिसरातील पाऊणशे गावचे नागरिक दैनंदिन व्यवहारासाठी त्यांचा नळदुर्गशी संपर्क आहे. अणदूर, नळदुर्ग, जळकोट, येणेगुर येथील आठवडी बाजार सर्वत्र प्रसिध्द आहे. त्यासाठी खूप दूर वरून व परप्रांतातून व्यापारी या भागात येतात. परिसरातील बहुतांश व्यापारी सुरत, मुंबई, पुणे, हैद्रबाद यासारख्या मोठ्या शहरातील बाजापेठेत खरेदी - विक्रीसाठी जातात. तसेच शेतकरी शेतात पिकवलेल्या शेतमालाची विक्री करण्यासाठी वरील शहराकडे जाण्याचा अधिक कल आहे. त्यामुळे सर्वांना सोईचा व किफायतशिर प्रवास हा रेल्वेचा आहे. मात्र ऐनवेळी तिकीट बुकिंग व आरक्षणाची सुविधा या भागात नसल्याने सर्वांची मोठी पंचाईत होते. नाईलाजाने पर्यायी म्हणून खासगी प्रवाशी वाहतूक करणा-या वाहनाकडे प्रवाशी वळतात. याबाबतची सविस्तर माहिती मारूती बनसोडे यांनी सांगितले असता जाधव यांनी व्यापारी, शेतकरी, भाविकांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने लवकरच नळदुर्ग शहरामध्ये रेल्वे बुकिंग व आरक्षणाची कार्यालय उघडण्यासाठी विषेश प्रयत्न करणार असल्याचे अश्वासन दिले. यावेळी संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष पुनम बीडकर, पत्रकार भैरवनाथ कानडे, शिवाजी नाईक, एस.के. गायकवाड, श्रावण वाघमारे, दादासाहेब चौधरी, दादासाहेब बनसोडे, राम नाईक, अरूण नाईक, विकास नाईक आदीजण उपस्थित होते.              
 
Top