नळदुर्ग  :- शहरवासियांना पाणीपुरवठा वेळेवर होवू शकला नाही. न.प. च्या ढिसाळ कारभारामुळे शहरवासियांच्या गैरसोयीबाबत नैतिक जबाबदारी स्विकारुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा पाणीपुरवठा समितीचे सभापती निरंजन देविदास राठोड यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा मंगळवार दि. 19 जुलै रोजी नगराध्यक्षांकडे दिला.

नगरसेवक निरंजन राठोड यांनी राजीनामा पत्रात पुढे नमूद केले की, पाणीपुरवठा सभापती पदाचा पदभार घेतल्यापासून पाणीपुरवठा विभागात जातीने लक्ष घालून नागरिकांना पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यासाठी पाणीपुरवठा विभागातील आढावा घेवून नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना वारंवार सांगितले. तसेच पाणीपुरवठयाचे साहित्य मोटारी, रिले हे जुने व खराब झाल्यामुळे बिघाड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन मोटारीचे व इतर साहित्याचे नियोजन करा असे वारंवार सांगून सुध्दा याकडे नगराध्यक्षांनी दुर्लक्ष केले असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

राठोड यांनी पदभार घेतल्यापासून वारंवार मोटारी बिघाड होवून शहराला पंधरा-पंधरा दिवस पाणीपुरवठा करता आलेला नाही. असे एक वेळी नाही तर 2-3 वेळा प्रसंग घडलेला नाही. तरी नगराध्यक्षांना नागरिकांच्या अति महत्त्वाच्या सुविधेबददल काळजी वाटली नसून केवळ सभापती पद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असल्याने मला व पक्षाला बदनाम करण्याच्या हेतूने आपण जाणीवपूर्वक पाणीपुरवठा विभागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नगरसेवक राठोड यांनी केला आहे.
 
Top