पालघर :- सीईटीची परीक्षा म्हणजे बारावीच्या परीक्षेवरील अविश्वास ठरावच आहे. आज विद्यापीठांमधून मिळणाऱ्या पदव्यांवर सरकार, व्यवस्था आणि शिक्षण विभाग यांपैकी कोणाचाही विश्वास नाही, हेच यातून दिसून येते. एखादा विद्यार्थी नापास होतो तेव्हा नेमेके कोण नापास होते? फक्त विद्यार्थीच नापास होतो की शिक्षक नापास होतात, विद्यापीठ नापास होते की शिक्षणव्यवस्थाच नापास होते? अशा शब्दात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी आजच्या शिक्षणव्यवस्थेचा फोलपणा दाखवून दिला.

पालघरमधील प्रयोगशील शिक्षक प्रल्हाद काठोले यांनी लिहिलेल्या गोष्ट गुरुजी घडण्याची या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. बंग यांच्या हस्ते शनिवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन मुंबई, रूईया महाविद्यालय आणि समकालीन प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सेवाग्राम ते निर्माण – शोध शिक्षणाचा आणि स्वतःचाही या विषयावर डॉ. बंग यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, ओआरएफ मुंबईचे प्रमुख सुधींद्र कुलकर्णी होते.

डॉ. बंग म्हणाले की, विद्यापीठांमधून देण्यात येते त्या शिक्षणातून थोडीफार माहिती मिळते, अंशतः कौशल्येही मिळतात पण ज्ञान आणि आत्मविश्वास मात्र मिळत नाही. त्यामुळे, मिळालेल्या माहितीचा वापर कुठे आणि कसा करायचा हे विद्यार्थ्यांना कळत नाही. आज शिक्षणव्यवस्थेने स्वतःला जगविण्यासाठी परीक्षा पद्धती उभी केली आहे आणि त्यासाठी मार्क्स हेचुकीचे टार्गेटही उभे केले आहे. गांधीजी आणि विनोबांनी आपल्या शिक्षणविषयक नवा विचार मांडला, पण आपण तो स्वीकारला नाही. त्यामुळे आजचे शिक्षण आयुष्याचे मिशन देण्यास अपयशी ठरले आहे.

आज आपण जीवन आणि शिक्षण असे दोन तुकडे केले आहे. जीवनापासून तुटलेले, क्लासरूमच्या चार भिंतींमध्ये कोंडलेले आणि जीवनाची तयारी करण्यासाठी म्हणून आज जे काही शिकविले जाते ते शिक्षण नसून टॉर्चर आहे. शिक्षण हे जगता-जगता घडते, ते सहजपणे देता येते. कारण मूळात जीवन आणि शिक्षणामध्ये द्वैत नसून,  जीवन हेच शिक्षण आहे. हे सांगताना डॉ. बंग यांनी त्यांच्या मुलाला अमृत यांना शाळेत न घालता, जीवनाच्या शाळेत कसे शिकविले याचे किस्सेही सांगितले.

जीवन हे शिक्षणाचे अनुषांगिक फळ आहे. त्यासाठी शिक्षणाचा वेगळा कार्यक्रम करावा लागत नाही. विद्यार्थ्यांना त्रास न देता, जीवनाचे धडे देणारे, शिक्षण देणारे प्रयोग आज जगभर होत आहेत. कशासाठी जगायचे आहे हे कळले की कसे जगायचे हा प्रश्न दुय्यम होतो. यासाठीच आम्ही निर्माण हा प्रयोग करत आहोत. यातून दरवर्षी काही निवडक मुले गडचिरोलीतील शोधग्राममध्ये जीवनाचे ध्येय शोधतात. समाजासाठी स्वतःला वापरण्याचे कौशल्य मिळवतात. आज राज्यभर असे निर्माणचे शेकडो विद्यार्थी विविध क्षेत्रात उत्तम काम करत आहेत, असे सांगत त्यांनी शिक्षणाच्या या आजच्या अवस्थेला पर्याय उपलब्ध आहे हे वास्तव मांडले.

वाडा तालुक्यातील बालिवली जिल्हा परीषदेच्या शाळेत शैक्षणिक प्रयोग करणाऱ्या काठोले यांना ओआरएफ मुंबईतर्फे पाठ्यवृत्ती देण्यात आली. त्यातून गोष्ट गुरुजी घडण्याचीहे पुस्तक साकार झाले आहे. आपल्या मनोगतात काठोले म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगातही संवेदनशील शिक्षकाची जागा कोणीही घेऊ शकत नाही. मुलांच्या नेमक्या भावना आणि अडचणी समजून घेऊन त्यातून त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करणे हे शिक्षकासमोरील खरे आव्हान असते आणि शिक्षकासाठीदेखील ही शिकण्याचीच प्रक्रिया असते. फक्त पदवी घेऊन चांगले शिक्षक होता येत नाही.


कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, काठोलेंसारखे शिक्षक महाराष्ट्रातील गावागावांमध्येच नव्हे तर देशभरात घडले पाहिजेत. शिक्षक हा समाजाला घडवित असतो, अशा देश घडविणाऱ्या या शिक्षकांची परंपरा कायम राहायला हवी. चांगल्या शिक्षणासाठी चांगल्या साहित्याची गरज असते आणि भारतीय भाषांमधील सकस साहित्य जगभरातील भाषांमध्ये जायला हवे. तसेच तेथील साहित्य आपल्याकडे यायला हवे, यासाठी ओआरएफ मुंबई नक्कीच प्रयत्न करेल. गोष्ट गुरुजी घडण्याचीहे पुस्तकही इंग्रजीमधून प्रकाशित करण्यात येईल.
 
Top