नळदुर्ग येथे शनिवारी कबाला हक्क परिषदेचे आयोजन

उस्मानाबाद :- शासकीय जमिनीवर राहणा-या कुटूंबांना हक्काचा कबाला मिळावा या प्रमुख मागणीसाठी श्रावणबाळ माता-पिता सेवा संघ उस्मानाबाद शाखेच्यावतीने नळदुर्ग येथे शनिवार दि. 27 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली कबाला हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
नळदुर्ग येथे होणा-या कबाला हक्क परिषेदचे उदघाटक म्हणून श्रावणबाळ माता-पिता सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र हे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मानवी हक्क अभियान मराठवाडा विभागाचे अध्यक्ष बजरंग ताटे, उच्च न्यायालयाचे ॲड. पी.एस. पवार, ॲड. डी.एस. माळी तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य बिभीषण जाधव, संघटनेचे अहमदनगर जिल्हा समन्वयक शंकर चंदन, शिर्डीचे नगरसेवक सुरणे आरणे, जेष्ठ पत्रकार कल्याण देशमुख यांच्यासह राज्यभरातून मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
श्रावणबाळ माता-पिता सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिका क्रं. 39/2014 मध्ये दि. 23 जून 2015 मध्ये निकाल देताना उच्च न्यायालयाने राज्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे आदेश दिलेले आहेत. या आदेशाचे पालन करुन दि. 23 सप्टेंबर 2015 रोजी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी शासकीय जमिनीवर राहणा-या कुटूंबांना मालकी हक्काचे उतारे (कबाला) देण्याबाबत उस्मानाबाद जिल्हाधिका-यांना आदेश दिला. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी ऑक्टोबर 2015 मध्ये उस्मानाबाद जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसिलदार यांना सदरील आदेशाची अंमलबजावणी करण्याची लेखी सुचना दिलेली असतानादेखील अदयाप त्याची अंमलबजावणी झाली नाही. उलट आदेशाला केराची टोपली दाखवत अतिक्रमण हटावच्या नावाखाली नळदुर्ग येथील शेकडो कुटूंबांचे घरे उध्दवस्त करुन त्यांना बेघर केले. त्याचबरोबर अनेकांना घरे काढण्याच्या नोटीसा दिल्या जात आहेत. त्यामुळे अनेक कुटूंबे दहशतीच्या सावटाखाली आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीच्या आदेशात अतिक्रमित जागेवर पूर्वीपासून राहणा-या कुटूंबांना त्याच जागेवर घरे बांधून देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या धोरणाकडे प्रशासकीय अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन वर्षानुवर्षे शासकीय जमिनीवर वास्तव्य करुन राहणा-या गोरगरीबांना घर जागेचे कबाला देण्याचे टाळत आहेत. तर कबालाअभावी रमाई आवास योजनेचा लक्षावधी रुपयाचा निधी पडून आहे. याकरीता शासकीय जमिनीवर राहणा-या कुटूंबांना “हक्काचा कबाला” मिळावा या प्रमुख मागणीसाठी नळदुर्ग येथे शनिवार दि. 27 ऑगस्ट रोजी कबाला हक्क परिषदेचे आयोजन केले आहे. तरी जमिनीवर राहणा-या कुटूंबांनी कबाला हक्क परिषदेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख शिवाजी नाईक, जिल्हा समन्वयक एस.के. गायकवाड, तालुका समन्वयक सचिन डुकरे, नळदुर्ग शहर समन्वयक मन्सूर शेख यांनी केले आहे.


 
Top