‘कान्हा’ चित्रपटाला भरभरून यश मिळो - मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी दिल्या शुभेच्छा
-------------------------------------------------

“आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात आजवर विविध उपक्रम सक्षमपणे हाताळणारे प्रताप सरनाईक चित्रपट निर्मितीतूनही एक महत्त्वाचा सामाजिक विषय मांडत आहेत. ‘कान्हा’ चित्रपटातून दहिहंडीच्या विविध प्रश्नांचा उहापोह करण्यात येईल अशी अपेक्षा मला आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा आणि त्याला भरभरून यश मिळावे आणि या चित्रपटाने सर्व विक्रम मोडावे” अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान्हा चित्रपटाला दिल्या निमित्त होतं या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्याचं. मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये रंगलेल्या या शानदार सोहळ्यात विविध पक्षांतील राजकीय नेत्यांसह उद्योग क्षेत्रातील आणि मराठी हिंदी मनोरंजन दुनियेतील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या विहंग एंटरटेन्मेटची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अवधूत गुप्ते यांचं आहे. चित्रपटात वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी आणि गौरी नलावडे हे कलाकार मुख्य भूमिकेत असून झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेला हा चित्रपट येत्या २६ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

काय आहे कथानक ?

गोपाळकाला, मुळात पाहिलं तर श्रावणमासात येणार हा एक सण, आपल्या लाडक्या कृष्णाला बालगोपाळांनी दहीहंडी फोडून दिलेली मानवंदना. पण गेल्या काही वर्षात यातला सण मागे पडला आणि जीवघेण्या इर्षेने या निरागस खेळात प्रवेश केला आणि इर्षा होती जास्तीत जास्त थरांचा मानवी मनोरा लावून सगळ्यात उंच दहीहंडी फोडण्याची. साहजिकच ह्या ईर्षेचा फायदा घेतला काही राजकीय लोकांनी. प्रत्येक थरागणिक पैसे वाटू जाऊ लागले. लाखो रुपयांची बक्षिसे वाटली जाऊ लागली. मोठमोठाले मंडप उभारून, सेलिब्रिटीना आवताण धाडून या सणाला इव्हेंटचं स्वरूप देण्यात आलं आणि ह्या सर्व झगमगाटात दह्या दुधाच्या प्रसादाबरोबरच सच्चा गोविंदा मागे पडला. दहिहंडीचा थरार बघता बघता गोविंदाच्या जीवावर बेतायला लागला ज्यात अनेक गोविंदा झाले तर काहींचा दुर्दैवी मृत्युही झाला. गोविंदांच्या जीवाची हिच सुरक्षा लक्षात घेऊन न्यायालयाने या उत्सवावर आणि यात रचल्या जाणा-या थरांच्या संख्येवर बंधने आणली. या मुद्यावर अनेक चर्चा झाल्या. त्याचसोबत गोपाळकाल्याला साहसी खेळाचा दर्जा मिळावा म्हणून पुन्हा त्याच न्यायालयात याचिकाही दाखल केल्या गेल्या. गोविदांची सुरक्षा महत्त्वाची की सण उत्सव महत्त्वाचा ? पारंपरीक सणाचं स्वरूप योग्य की त्याला आलेलं इव्हेंटचं स्वरूप योग्य ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. याच प्रश्नांतून ‘कान्हा’ चित्रपटाच्या कथेचा जन्म झाला. या सर्व प्रकरणात या सणाचा झालेला खेळखंडोबा आणि त्या अनुषंगाने या खेळात चोरपावलाने शिरलेलं राजकारण, यात भरडले जाऊन एकमेकांसमोर उभे ठाकलेले मल्हार आणि रघू यांची गोष्ट प्रेक्षकांना ‘कान्हा’ मधून बघायला मिळणार आहे .

‘कान्हा’च्या संगीताविषयी

या चित्रपटात एकूण सहा गाणी असून ती अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केली आहेत. यात कृष्णजन्माचं गाणं लिहिलय मंदार चोळकर व गायलंय सोनू कक्कर आणि वैशाली सामंत आणि अवधत गुप्ते यांनी , ‘गोपाळा रे गोपाळा’ हे अरविंद जगताप यांनी लिहिलेलं गीत ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि कैलाश खेर यांनी स्वरबद्ध केलंय. तर ‘मित्रा’ हे गोविंदाच्या भावना व्यक्त करणारं वैभव जोशीं यांचं गीत आदर्श शिंदे आणि रोहित राऊत यांनी गायलंय. तरूणाईत असलेली दहिहंडीच्या उत्साहाची झिंग मांडणारं ‘तू मार किक रे गोविंदा’ हे गीत अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर यांनी तर ‘रडायचं नाय आता चढायचं’ हे गाणं पूर्वेश सरनाईक आणि अवधूत गुप्ते यांनी गायलं आहे.

मान्यवरांची मांदियाळी

कान्हाच्या या संगीत प्रकाशनासाठी अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. राजकीय नेत्यांमध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम, आमदार एकनाथ शिंदे, समाजवादी पक्षाचे माजी महासचिव अमर सिंह, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, कॉंग्रेस पक्षाचे विजय दर्डा, बाबा सिद्दीकी यांसह अनेक नेते, आमदार उपस्थित होते. बॉलिवडच्या मंडळींमIध्ये ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र, संजय खान, जावेद जाफरी, अपूर्व अग्निहोत्री, रोनित रॉय, सचिन पिळगावकर, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, गोदरेज उद्योग समुहाचे अदी गोदरेज यांचीही विशेष उपस्थिती होती.

भाऊ कदम आणि निलेशने पसरवली विनोदाची हवा

संगीत प्रकाशनाच्या या सोहळ्यात ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे निवेदक डॉ. निलेश साबळे आणि अभिनेते भाऊ कदम यांनी विनोदाचे रंग भरले. यावेळी या दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दहिहंडीच्या आठवणी जाणून घेत आपल्या खास शैलीत संवाद साधला.

- के. रवी, मुंबई
 
Top