सोलापूर, दि. ०२ : मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलाच जोर धरला आहे़ आतापर्यंत ८१ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ याशिवाय उजनी धरण १०० टक्के भरण्याच्या वाटेवर असल्याने धरण परिसरातील शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे़

जिल्ह्यात पुष्य व उत्तरा नक्षत्राच्या पावसाने सर्वत्र पाणी-पाणी झाले असताना हस्त नक्षत्रातही संततधार सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८१ टक्के पाऊस पडला असून, सततच्या पावसाने खरीप पिकांना धोका तर ज्वारीच्या पेरणीला विलंब होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात यावर्षी पाऊस समाधानकारक पडला आहे. १९ ते २९ जुलै दरम्यान जिल्ह्याचा जवळपास सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला होता. त्याअगोदर व नंतर काही भागातच पाऊस पडला. त्यानंतर १३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत सगळीकडे पाऊस पडला. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जिल्ह्यात संततधार सुरू झाली आहे. आॅगस्ट महिन्यात दीड महिना पाऊस नसल्याने खरिपाची काही पिके गेली होती तर उत्तराच्या संततधार पावसाने आलेली काही पिके पाण्यात गेली. खरिपाची तूर अन्य काही वाचलेली पिके चांगली असली तरी हस्त नक्षत्राच्या पावसाने राहतील की नाही हे सांगता येत नाही. यामुळे शेतकरी वर्ग दोन्ही बाजूने संकटात सापडला आहे.

🌀 *जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस*

सोलापूर जिल्ह्यात एकूण पावसाळ्यात ५३७७ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ४३६३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४४५६ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात ३० सप्टेंबरअखेर एकूण ४४५६ मि.मी. तर सरासरी ४०५ मि.मी. पाऊस पडला. याची टक्केवारी ८१.१५ इतकी येते. उत्तर तालुक्यात ९०.५५ टक्के, दक्षिण तालुक्यात ८८.९६ टक्के, बार्शीत ८२.७३ टक्के, अक्कलकोटमध्ये ७०.६२ टक्के, मोहोळ तालुक्यात ५५.९३ टक्के, माढा तालुक्यात ९२.३३ टक्के, करमाळ्यात ७२.३७ टक्के, पंढरपूर तालुक्यात ६७.९९ टक्के, सांगोला तालुक्यात १०९.९२ टक्के, माळशिरसमध्ये १०९.३० टक्के तर मंगळवेढा तालुक्यात ६५.४९ टक्के पावसाची नोंद झाली.
__________________________________
 
Top