*नळदुर्गचा किल्‍ला काल, आज आणि उदया*

पौराणिक, ऐतिहासिक व आधुनिकतेची विरळ अशी अदभूत पार्श्‍वभूमी असलेल्‍या नळदुर्ग किल्‍ल्‍यामध्‍ये पर्यटकांच्‍या डोळ्याचे पारणे फेडणारा विहंगम दृश्‍याची निर्मिती झाली आहे. तीन वर्षापूर्वी नळदुर्गचा किल्‍ला अखेरची घटका मोजत होता. याचदरम्‍यान महाराष्‍ट्र वैभव राज्‍य संरक्षित स्‍मारक संगोपन योजनेंतर्गत सोलापूरच्‍या युनिटी मल्ट्रिकॉन्‍स प्रा.लि. कंपनीने हा किल्‍ला संगोपनार्थ पुरातत्‍व व वास्‍तू संग्रहालय संचनालय महाराष्‍ट्र शासनाकडून सामंजस्‍य करारान्‍वये दि. 26 ऑगस्‍ट 2014 रोजी घेतला. अल्‍पावधीतच भग्‍न अवस्‍थेतील किल्‍ल्‍यात सुशोभिकरण व विकासात्‍मक बदल घडवून हजारो पर्यटकांना साद घालण्‍यात यशस्‍वी ठरत आहे. युनिटी मल्ट्रिकॉन्‍सचे कार्यकारी संचालक कफील मौलवी, संचालक भारत जैन, जयधवल करकमकर, अनिल पाटील हे पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्‍ध करण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहेत.

    नळ राजाची पत्‍नी दमयंती ही श्री खंडोबाची भक्‍त असल्‍यामुळे महाराष्‍ट्रातील असंख्‍य भक्‍तांचे कुलदैवत असलेल्‍या खंडोबाचे लग्‍न बाणाईशी याच नळदुर्ग किल्‍ल्‍यामध्‍ये झाल्‍याची अख्‍यायिका आहे. वार्षिक यात्रोत्‍सवा दरम्‍यान महाराष्‍ट्रातील असंख्‍य भाविक किल्‍ल्‍यास भेट देवून उपली बुरुजाच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या खंडोबाच्‍या मुळ स्‍थानाचे दर्शन घेतात. स्‍थापत्‍य शास्‍त्रातील अदभूत चमत्‍कार समजला जाणारा किल्‍ल्‍यातील नर-मादी धबधबा सोळाव्‍या  शतकात इब्राहीम आदिलशहा दुसरा याच्‍या कालखंडात बांधण्‍यात आला. याच कालखंडामध्‍ये किल्‍ल्‍यातील अनेक वास्‍तूंची निर्मिती करण्‍यात आली. स्‍वातंत्र्यपूर्व काळात किल्‍ल्‍यामध्‍येच मुन्‍सफ कोर्ट व नळदुर्ग हे जिल्‍हयाचे ठिकाण होते. हैद्राबाद मुक्‍ती संग्राम लढयानंतर हा प्रदेश भारतात विलीन झाला व ऐतिहासिक किल्‍ला केंद्र शासनाच्‍या  अधिपत्‍याखाली आला. किल्‍ल्‍याचा अवाढव्‍य परिसर पाहता सरकारकडून नेमण्‍यात आलेल्‍या जेमतेम कर्मचा-यावर देखरेखीचा भार होता. या अपु-या कर्मचा-यामुळे किल्‍ल्‍याच्‍या भग्‍न अवस्‍थेमध्‍ये दिवसेंदिवस भर पडत गेली. पावसाळ्यातील पंधरा-वीस दिवस वगळता वर्षभर किल्‍ल्‍यात येणा-या पर्यटकांची संख्‍या कमी असायची. मात्र आजघडीला युनिटी कंपनीच्‍या परिश्रमामुळे पर्यटकांचा ओघ सुरु आहे.  

  युनिटी कंपनीच्‍या माध्‍यमातून किल्‍ल्‍यात येणा-या पर्यटकांसाठी सुसज्‍ज वाहन पार्किंगची सोय उपलब्‍ध केली आहे. किल्‍ल्‍याच्‍या तटबंदीवर व किल्‍ल्‍यात सर्वत्र झाडे-झुडपे वाढली होती. किल्‍ल्‍यात जाण्‍यासाठी रस्‍ते नव्‍हते. जे होते ते अरुंद व पाऊलवाटा होत्‍या. किल्‍ल्‍यात सर्वत्र जनावरांचे मलमूत्र पडायचे. मात्र युनिटी कंपनीने संगोपनार्थ हा किल्‍ला  घेतल्‍यानंतर आश्‍चर्यकारक परिस्थिती बदलली आहे. वरील सर्व अडचणी दूर करुन हा किल्‍ला सुंदर व आकर्षक, मनोरंजनाच्‍या ठिकाणात परिवर्तित झाल्‍याचे दिसत आहे. किल्‍ल्‍याच्‍या मुख्‍य प्रवेशद्वारास ऐतिहासिक स्‍वरुपाचा दरवाजा बसविण्‍यात आले आहे. किल्‍ल्‍यामध्‍ये आठ सुरक्षा रक्षक तैनात करण्‍यात आले आहे.

*युनिटीने किल्‍ल्‍यात केलेली ठळक विकास कामे :-*

मुख्‍य प्रवेशद्वार, बारादरी, पाणीमहल, उपली बुरुज आदींची डागडुजी करण्‍यात आली. (खर्च - दीड कोटी रु.)

किल्‍ल्‍यातील ऐतिहासिक इमारतीस जोडणारे सर्व रस्‍ते सुसज्ज तयार करण्‍यात आले. रस्‍त्‍याच्‍या कडेला फुलझाडांचे सुशोभिकरण करण्‍यात आले. (खर्च - अडीच कोटी रु.)

बोरी नदी ते पाणी महाल पर्यंत गाळ काढून नदीतील झाडे-झुडपे काढून नदीपात्राची रुंदीकरण व खोलीकरण करण्‍यात आले. (खर्च - 3 कोटी रु.)

किल्‍ल्‍यास भेट देणा-या पर्यटकांकरीता महिला व पुरुषांकरीता प्रत्‍येकी तीस स्‍वच्‍छता गृह बांधण्‍यात आले. (खर्च - 10 लाख रु.)

पर्यटकांना पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध करुन देण्‍याकरीता विंधन विहीर घेवून जलशुध्‍दीकरण यंत्र बसविले आहे. त्‍यामुळे पर्यटकांना मिनरल वॉटर (साधे पाणी) मोफत उपलब्‍ध केले आहे. तर थंड पाणी एटीएम मशीनद्वारे अल्‍प दरात उपलब्‍ध केले आहे. (खर्च - 3 लाख रु.)

पर्यटकांसाठी किल्‍ल्‍यात ठिकठिकाणी आसनव्‍यवस्‍था निर्माण करण्‍यात आली आहे. (खर्च - 15 लाख रु.)

किल्‍ल्‍यातील स्‍वच्‍छतेकरीता सहा सफाई कामगारांची नेमणूक केली असून जागोजागी डस्‍टबीन (कचराकुंडी) ची सोय करण्यात आली आहे. त्‍यावर महिनाकाठी 40 हजार रुपये खर्च केला जातो.

राज्‍यातील पुणे व आंध्रप्रदेशातील राजमंद्री येथून देशी-विदेशी आकर्षक विविध प्रकारची 10 हजार फुलझाडे किल्‍ल्‍यात सर्वत्र लावून सुशोभित करण्‍यात आले आहे. (खर्च - 60 लाख रु.). फुलझाडे कामासाठी बाहेरुन 2 हजार पेक्षा अधिक ट्रॅक्‍टर काळी माती आणून त्‍यावर फुलझाडे लागवड करण्‍यात आली आहेत. यापैकी अनेक ठिकाणचा परिसर रंगबेरंगी फुलांनी बहरुन गेला आहे. काळ्या मातीसाठी जवळपास 35 ते 40 लाख रुपये खर्च झाला आहे.

किल्‍ल्‍यामध्‍ये सर्वत्र ठिकठिकाणी बगीचा (लॉन) तयार करण्‍यात येत आहेत.

केरकचरा, साफसफाई, सुरक्षा रक्षक, किल्‍ल्‍यातील भिंतीवरील व जमिनीवरील झाडे-झुडपे वेळोवेळी काढण्‍याच्‍या कामावर दरदिवशी 5 हजार तर महिन्‍याकाठी दीड लाख रुपये खर्च करण्‍यात येत आहे.
भविष्‍यात संगीत कारंजे, किल्‍ल्‍याच्‍या बाह्य तटबंदीस आकर्षक विद्युत रोषणाई करण्‍यात येणार आहे.

नर-मादी
नर-मादी धबधबा हा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. वर्षभरातील सुट्टीच्‍या व ठराविक दिवशी आधुनिक तंत्रज्ञानाच्‍या सहाय्याने चालू करण्‍याचा मानस आहे. नर-मादी धबधबा व पाणी महालच्‍या आतील बाजू स्‍वच्‍छता करुन डागडुजी करण्‍यात आली. सुरक्षा जाळी बसविण्‍यात आल्‍या. वाहून जाणारे पाणी थांबण्‍यासाठी 90 हजार क्‍युबिक मीटरचे दोन तलाव तयार करण्‍यात आले. त्‍यामध्‍ये 2 कोटी लीटर पाणी साठवण्‍याची क्षमता आहे. या पाण्‍यावरच नर-मादी धबधबा चालू करण्‍यात येणार आहे. या कामावर जवळपास 2 कोटी रुपये खर्च झाले आहे.

साहसी क्रीडा प्रकाराच्‍या माध्‍यमातून आत्‍मनिर्भर होण्‍यासाठी विविध उपक्रम राबविण्‍यात येणार आहे. यामध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍यातील सर्वात मोठी झीप लाईन (वायर रोब) उपली बुरुज ते परंडा बुरुज यादरम्‍यान अंदाजे 600 मीटर लांबीचे तयार करण्‍याचे काम प्रगतीपथावर आहे.

बोटींग, रायफल शुटींग, रोप क्‍लायबिंग, स्‍पोटर्स, पॅरा ग्‍लॉडिंग, चक्रव्‍यूह, आर्चरी, झारबिंग, लहान मुलांसाठी एटीव्‍ही ट्रॅक्‍स, गिर्यारोहण, स्विमिंग आदी साहसी खेळासाठी प्रकल्‍पाचे काम सुरु आहे.

उस्‍मानाबाद, लातूर, सोलापूर या तीन जिल्‍ह्यासाठी मनोरंजनात्‍मक व शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांसाठी साहसी खेळाची निर्मिती करण्‍यात येत आहे.


 
Top