बार्शी -: कोणत्याही सहकारी संस्थेतील विश्वस्तांनी निवडणुकीच्या भानगडीत पडण्याऐवजी एकमेकांच्या विश्वासाने सचोटीने संस्था चालवावी. संस्था टिकवायची असेल वाढवायची असेल तर मुख्य पदाधिकारी यांनी पदाकरीता संस्थेत राजकारण आणू नये, असे मत सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. दिलीप सोपल यांनी व्यक्त केले.
    रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्रसिध्द विधीज्ञ ॲड. बी.एन. चव्हाण, संस्थेचे चेअरमन देविदास बारंगुळे, शिवाजी पवार, रघुनाथ कोल्हे, नागेश कातुरे, आर्यन शुगर्सचे कार्यकारी संचालक विलास रेणके, गणेश पाटील, नगरसेविका संगिता मेनकुदळे, सौ. सोडळ, मंगलताई शेळवणे, रिझवाना शेख, माजी नगरसेवक आबा पवार, पांडुरंग गोंदील, विक्रम सावळे, यशवंत सावळे, संग्राम गायकवाड, महादेव जगताप, सुभाष उंदरे आदी उपस्थित होते.
    पुढे बोलताना ना. सोपल म्हणाले, संस्थेचे प्रमुख संचालक निवडणुकीच्या कारणासाठी भांडत बसले तर त्याचा गैरफायदा इतर लोक घेतात. सहकार क्षेत्रात ज्या भावनेने स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, विखेपाटील यांच्यापासून कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांनी सातत्याने सहकार क्षेत्राच्या विकासासाठी व सर्वसामान्यांच्या उपयोगासाठी संपूर्ण जीवनभर योगदान दिले आहे. पंरतु सहकाराचा काही माणसे त्याचा गैरफायदा घेत आहेत. चांगल्या चाललेल्या सहकारी संस्थेत ऐनतेन प्रकारे घुसण्याचा काहीजण सातत्याने प्रयत्न करतात आणि त्यात घुसणे जमले नाही तर त्या संस्थेचे वाटोळे करण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्तींनी स्वत:च्या संस्था उभ्या कराव्या, त्या संस्थेचा लोकांच्या मनात विश्वास संपादन करावा. यावेळी त्यांना खरे कष्ट दिसून येईल. लोक आपल्या पतसंस्थेत येताना तुमच्यावरील असलेल्या विश्वासामुळे येत आहेत. योग्य कर्जदार पाहिल्याशिवाय ठेवीदारांना आपल्या ठेवी पतसंस्थेत ठेवण्यास ताटकळत थांबवणे हे चांगल्या पतसंस्थेचे लक्षण आहे. कर्ज घेण्यासाठी येताना त्यांचा कीव येईल, असा चेहरा आणि पुन्हा वसुलीच्या वेळी त्यांचा खरा चेहरा सहकारी संस्थांना पहावयाला मिळतो. यावेळी ते आई-बापांचा उध्दार देखील करायला मागे पुढे पाहत नाहीत. आपल्या चांगल्या दिवसांतच चुकुन येणा-या वाईट दिवसांची तरतूद करा, उगाच घबाड म्हणून पळू नका, यशाला शॉर्टकट नको, आजपर्यंत अनेक संस्था आल्या आणि गेल्या परंतु योग्य नियोजन केलेल्या संस्था अजूनही टिकून आहेत, असेही ना. सोपल यांनी शेवटी सांगितले.
 
Top