काटी :- तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे गुरुवार दि. 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता येथील कचेश्वर मंदीरात आठवडाभरावर आलेल्या गणेशोत्सवाच्या व मोहरमच्या पार्श्वभूमिवर तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समिती सदस्यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित सदस्यांना संबोधित करताना बोकडे यांनी यंदा गणेशभक्तांच्या सोयीसाठी पोलीस आयुक्तालयाने ऑनलाईन अर्जाची तरतूद केली असून ऑनलाईनद्वारे परवानगी काढण्याचे सुचित करुन सर्व मंडळाने सर्व नियमांचे पालन करून डीजेरहित गणेशोत्सव, मोहरम सण साजरा करण्याचे आवाहन केले व गणेश उत्सवादरम्यान मंडप उभारण्याबाबत काही नियम आहेत. त्याची माहिती देऊन या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच उत्सवाच्या काळात सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जातात. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्नही केले जातात. अशा संदेशांकडे दुर्लक्ष करून ते पोलिसांच्या लक्षात आणून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थित सदस्यांनीही प्रश्न उपस्थित केले त्यांच्या सुचनांचीही नोंदही पोलीस निरीक्षक बोकडे यांनी घेतली.
यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, पोलीस पाटील लक्ष्मण माळी, बीट अंमलदार लक्ष्मण माने आदीसह गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.