तुळजापूर (दास पाटील) :- 

थकीत विजबिलामुळे महावितरणने शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. तुळजापूर नगरपरिषदेकडे महावितरणची तब्बल ८३ लाख रु. थकबाकी आहे. यापैकी चालू बाकीतील २ लाख ६० हजार रु. विजबीलाचा भरणा पालिकेने केला आहे.

परंतू तरीही महावितरणने सार्वजनिक विद्युत व्यवस्थेचा विजपुरवठा खंडीत केला आहे. यामुळे संपूर्ण शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तुळजापूर शहर प्राधिकरणात भवानी रोडचे काँक्रेटीकरण करताना पूर्वीचे पथदिवे काढून टाकण्यात आले आहेत. त्या ठिकाणी नवीन पथदिवे अद्यापपर्यंत बसवण्यात आले नाहीत. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ता असलेला भवानी रोड मागील तीन चार वर्षांपासून अंधारातच आहे.

त्यातच आता संपूर्ण शहरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा महावितरणने खंडीत केल्यामुळे अडचणीत भर पडली आहे. मागील आठ दिवसांपासून संपूर्ण शहर अंधाराच्या खाईत लोटले गेल्यामुळे नागरिकातून पालिकेच्या गलथान कारभाराविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.  

या अंधाराचा फायदा घेऊन भुरटे चोर संधी साधत आहेत. शहरातील कमानवेस भागात डुल्या मारुती मंदीरानजिक भाविकांच्या वाहनातील किमती चीजवस्तू, गाडीतील पेट्रोल, डिझेल लांबवण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.
त्यामुळे भाविकात घबराट पसरली आहे.

रात्री सर्वच मार्गावर अंधार असल्याने परगावावरून आलेले भाविक रस्ता चुकत आहेत. याबाबत संबधीत अधिकाऱ्यांनी मार्ग काढून शहराचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरळीत करावा, अशी मागणी भाविकांसह नागरिकांतून होत आहे.
 
Top