तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जणाचे आराध्य दैवत, आदीमाया-आदी शक्ती असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवापुर्वी मंचकी निद्रेस शुक्रवार दि. ९ ऑक्टोबर रोजी रोजी सायंकाळी भक्तीमय वातावरणात "आई राजा उदो उदो च्या" गजरात भक्ताविना प्रारंभ झाला. ९ दिवसाची मंचकी निद्रा पुर्ण झाल्यानंतर दि. १७ ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी मातेची मुख्य चलमुर्ती पहाटे सिंहासनावर विराजमान होणार दुपारी १२ वाजता सिंह गाभाऱ्यात घटस्थापना करुन शारदीय नवरात्र महोत्सवास प्रांरभ होणार आहे. यावर्षी प्रथमच संसर्गजन्य कोरोना महामारीमुळे श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेच्या धार्मिक सोहळ्यावर कोरोनाचे सावट दिसुन आले.
तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदीरातील मंचकी निद्रेच्या शेजघराचे मानकरी पलंगे घराण्याकडून मंचकी निद्रेचा पलंग स्वच्छ धुऊन चकाचक करण्यात आला. त्यानंतर पलंगावरील गाद्या मंदीरातील श्री गणेश ओवरीत ठेवण्यात आल्या. या ठिकाणी मोजक्याच ५ सुहासनी महिलांच्या उपस्थित गाद्यातील कापुस निवडला. त्यानंतर धार्मिक रुढी परंपरेनुसार मुस्लिम बांधवाचे कापुस पिंजण्याचे ११ व्या पिढीचे मानकरी शम्मु बासुमियाँ पिजांरी व नदाफ मेहबुब पिंजारी यांच्यावतीने श्री देवीच्या निवडलेल्या गाद्याचा कापुस पिंजुन काढण्यात आला.
कापुस पिंजुन झाल्यानंतर गादी शिवण्याचे शिंपी समाजाचे मानकरी जनार्धन निकते व मंगेश निकते यांनी श्री देवीच्या गाद्याचे शिवन काम केले. तसेच गाद्या भरण्याचे काम अच्युत नागनाथ कुलकर्णी यांनी केले. यानंतर पलंगे घराण्याचे मानकरी अरुण पलंगे, नेताजी पलंगे, विनोद पलंगे, संग्राम पलंगे, प्रशांत पलंगे आदीसह पलंगे घराण्याचे मानकरी यांच्याकडुन श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेच्या पलंगास नवार बांधुन श्री देवीच्या मंचकी निद्रेचा पलंग तयार करुन पलंगावरती गाद्या ठेवण्यात आल्या.
संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे यंदा प्रथमच श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेच्या पलंगाचा कापुस निवडण्यासाठी महिला भगिनीची व आराधी मंडळीची या धार्मिक सोहळ्यास अनुउपस्थिती मोठ्या प्रमाणावर जाणवली. प्रत्येक वर्षी मंचकी दरम्यान मोठा जल्लोष असायचा. यंदा मात्र तो पहावयास मिळाला नाही. त्यामुळे अनेक महिला भक्तासह आराधी मंडळीची अखंड सेवा मोडीत निघाली. यामुळे अनेक श्री देवी भक्त महिलांचा, आराधी मंडळीचा भ्रम निराश झाला.शुक्रवारी सायंकाळी श्री देवीजीस दुग्धा पंचामृत घालुन झाल्यानंतर श्री देवीची मुख्य चलमुर्ती सिंहासनावरुन हलवुन "आई राजा उदो उदोच्या " गजरात मंचकी निद्रेच्या शेजघरातील चांदीच्या पलंगावरती निद्रीस्त करण्यात आली. यानंतर पलंगावरती श्री देवीची यथा सांग पुजा करवुन दुपारती करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यास श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे तहसीलदार सौदागर तांदळे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा महंत हमरोजीबुवा, मुख्य भोपे पुजारी, पाळीकर पुजारी, उपाध्ये, पुजारी, सेवेदार उपस्थित होते.


