कुलस्वामिनीच्या चरणी अभिनेत्री प्राजक्ता माळी; तुळजाभवानी मंदिरात सहकुटुंब पूजा-अर्चा

तुळजापूर, दि. ३१ जुलै :

मराठी चित्रपटसृष्टी आणि दूरचित्रवाणी विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर येथे सहकुटुंब दर्शन घेत पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली. गुरुवारी (दि. ३०) रात्री मुख्य शेजारती (प्रक्षाळपूजा) प्रसंगी ती मंदिरात उपस्थित होती.

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्राजक्ता माळीने देवीची ओटी भरून कुलधर्म आणि कुलाचार विधीवत पार पाडला. या धार्मिक विधीचे पौरोहित्य भोपे पुजारी स्वराज कदम आणि भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केले.

दर्शनानंतर मंदिर संस्थानच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी उपेंद्र तामोरे यांच्या हस्ते प्राजक्ता माळी यांचा श्रीफळ, देवीची साडी आणि तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्राजक्ता माळी यांनी देवीच्या दर्शनाचा आनंद व्यक्त करत भाविकांशी संवाद साधला. तुळजापूर मंदिर परिसरात सध्या विकास आराखड्याअंतर्गत विविध कामे सुरू असल्याने भाविकांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. मात्र, भविष्यात मंदिर अधिक भव्य आणि सुविधायुक्त होण्यासाठी ही कामे आवश्यक असल्याचे सांगत, मंदिर प्रशासनाला सहकार्य करण्याचे आणि मोठ्या संख्येने आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्राजक्ता माळी यांच्या आगमनामुळे मंदिर परिसरात भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या दर्शनासाठी आणि भेटीसाठी अनेक भाविकांनी गर्दी केली.
 
Top