सांगोला :- सांगोला शहर व तालुक्यातील अवैध प्रवासी वहातूक, दारु, मटका, जुगार व आदि अवैध धंदे तात्काळ बंद करावेत तसेच निष्क्रीय पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करावी अन्यथा दि. 1 मे रोजी शिवसेनेच्या वतीने लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब यांनी राज्याच्या गृहमंत्र्यासह संबंधित अधिकार्‍यांकडे लेखी निवेदनाद्वारे केला आहे.
        सांगोला पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी पदभार घेतल्यापासून शहर व तालुक्यात अवैध धंदे जोमात सुरु असून पोलीस अधिकारी अवैध धंदेवाल्यांना प्रोत्साहन देत असल्याने अवैध धंदेवाल्यांचा पोलीस स्टेशनला सतत वावर सुरु असतो. शिवाय पोलीस स्टेशनला येणार्‍या प्रत्येक अवैध धंदेवाल्यांचे स्वागत पोलीस अधिकारी थंड पाण्याची बाटली देऊन करतात हे विशेष. तालुक्यात पोलीस अधिकार्‍यांच्या आशिर्वादाने तालुक्यात अवैध धंद्याची लाखो रुपयाची मंथली घेवून दारु, मटका, जुगार, चंदन व अवैध प्रवासी वहातूक तेजीत सुरु आहे. ग्रामीण भागातून चंदन, गांज्या, वाळू व जनावरांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक पोलीस कर्मचारी महत्त्वाच्या गांवात आपली नेमणूक करावी यासाठी नेतेमंडळीच्या चिट्या-चपाटीची शिफारस करीत असल्याने कर्तव्यदक्ष पोलीसांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे.दरम्यान शहरात दारु, मटका, जुगार, अवैध प्रवाशी वहातूकीला आळा घालण्याऐवजी पोलीस अधिकारी रस्त्यावरुन दुचाकीवरुन डबलसीट, ट्रिपल सीटवर कामानिमित्त ये जा करणार्‍या शाळकरी मुले तरणांना पकडून कारवाई करण्याचा फार्स करीत आहेत. 
        केवळ कारवाईचा फार्स करणार्‍या निष्क्रिय पोलीस निरीक्षकांची बदली करावी व हप्ते घेवून सुरु असलेले दारु, मटका, जुगार अवैध प्रवासी वहातूक यासह अन्य अवैध धंदे तात्काळ बदं करावेत अन्यथा शिवसेनेच्या वतीने 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी पोलीस स्टेशनसमोर उपोषण करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब यांनी राज्याचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख सोलापूर, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
 
Top