बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : चिखर्डे (ता. बार्शी) येथील एका 23 वषी्रय युवकाच्‍या तोंडावर अज्ञान व्‍यक्‍तीने अॅसिड टाकल्‍याने खळबळ निर्माण झाली आहे.
    सुनिल पोपट कोंढारे असे त्‍या जखमीचे नाव असून बार्शी तालुक्‍यातील चिखर्डे येथे त्‍याचे किराणा मालाचे दुकान व तेथेच घर आहे. सदरच्‍या दुकान वजा घरात त्‍याच्‍या आणखी तिघा घरच्‍या व्‍यक्‍तीसमवेत सुनिल रात्रीचे जेवण करीत होता. यावेळी बाहेरुन कोणीतहरी अहो दुकानदार असा आवाज दिला. सुनिल याने काय पाहिजे, असे जवळ जात विचारले असता, बिसलरी पाण्‍याची बाटली आहे का? असा प्रश्‍न विचारला, नाही असे उत्‍तर दिल्‍यानंतर गाय छाप पुडी आहे का? असा प्रश्‍न विचारला व यापाठोपा वस्‍तूची नावे घेत हाताच्‍या मागे लपविलेल्‍या अँसिडचा मारा अचानकपणे सुनिलच्‍या तोंडावर केल्‍याने सुनिलच्‍या चेह-यावर जखम झाली.
    सदरच्‍या प्रकारामुळे सुनिलने विव्‍हळत आरडाओरड केल्‍याने त्‍याचे वडील धावत घराबाहेर आले. यावेळी सदरच्‍या अज्ञात इसमाने त्‍या ठिकाणाहून पळ काढला. सदरच्‍या इसमाचा मागोवा घेण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु त्‍याचा कसलाही ठावठिकणा त्‍यांना लागला नाही. इकडे सुनिलला इजा झाल्‍याने त्‍याला त्‍वरीत बार्शीतील जगदाळे मामा रूग्‍णालयात हलविण्‍यात आले. सदरच्‍या घटनेची संपूर्ण हकीकत पांगरी पोलिसांना सुनिल याने स्‍वतः सांगितली आहे. त्‍याने सांगितलेल्‍या वर्णनावरुन पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. सुनिलचे लग्‍न नुकतेच जमले होते. यावरुन गावात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. रूग्‍णालयात उपचार सुरु असताना सुनिलला सविस्‍तरपणे वर्णन करता येत नव्‍हते. तसेच तो नेमके कारण सांगू शकत नव्‍हता.

 
Top