बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : उजनी जलाशयाला कृष्‍णेतील वाया जाणा-या पाण्‍यातून भिमेत सोडण्‍याच्‍या कृष्‍णा भिमा स्थिरीकरण योजनेच्‍या बाबत दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत जनसेवा संघटना व विजयप्रताप युवा मंच शेतक-यांसाठी रस्‍त्‍यावर उतरेल, असा इशारा पत्रकार परिषदेत संघटना व मंचच्‍यावतीने देण्‍यात आला आहे.
    बार्शीताई शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्‍या पत्रकार परिषदेसाठी अँड. अनिल पाटील, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, साहेबराव देशमुख, नरेंद्र नलावडे, कौरव माने, अनिल डिसले, सुनिल पवार, उज्‍वलाताई जाधव आदी पद‍ाधिकारी उपस्थित होते.
    जिल्‍ह्यातील व जवळच्‍या जिल्‍ह्यातील अनेक शेतक-यांच्‍या पाण्‍याच्‍या प्रश्‍न या योजनेमुळे सोडविला जाईल. सदरच्‍या योजनेसाठी निधीची कमतरता असल्‍याचे सांगण्‍यात येत असल्‍याने त्‍याला विजयसिंह मोहिते पाटील यांनी सुचविलेल्‍या गाळ व वाळूच्‍या उत्‍पन्‍नातून सुमारे पन्‍नास हजार कोटींचे उत्‍पन्‍न मिळणार आहे. सदरची रक्‍कम याच योजनेत खर्च केल्‍यास शेतक-यांसाठी 100 टी.एम.सी. पाणी उपलब्‍ध होईल. सदरच्‍या योजनेत बार्शी तालुक्‍यातील जवळगाव, हिंगणी, ढाळे पिंपळगाव या डॅममध्‍ये पाणी पातळी वाढेल.
    सदरची योजना पूर्ण केल्‍यास सर्व शेतकरी मग कोणत्‍याही पक्षासाठी काम करणारे असो त्‍यांना त्‍याचा फायदा होणार आहे. या योजनेमुळे 70 ते 80 टक्‍के क्षेत्र बागायत होणार आहे. सदरच्‍या योजनेसाठी आमच्‍या संघटनेबरोबर शेतक-यांनी व विविध संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहनही यावेळी करण्‍यात आले.
 
Top