बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: मुलीच्‍या अश्लिल चित्रीकरणाची आपल्‍याकडे व्हिडीओ क्लिप असल्‍याचे सांगत मोठ्या रक्‍कमेची खंडली मागितल्‍याप्रकरणी पोलिसांनी विरेंद्र बगाडे या आरोपीस अटक केली आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 12 एप्रिल रोजी रात्री व दि. 13 च्‍या सकाळपर्यंत सदरचा धमकीचा प्रकार घडल्‍याची तक्रार त्‍या मुलीच्‍या पालकांनी बार्शी पोलिसात दिली. या धमकीमध्‍ये इशारा दाखल काही रक्‍कम नगरपरिषदेच्‍या शौचालयाजवळ आणून ठेवण्‍याची तसेच गुपचूप तेथून निघून जाण्‍याची धमकी देण्‍यात आली होती. त्‍यातील मागणीनुसार उर्वरीत रक्‍कम रविवारी सांगेल त्‍या ठिकाणी ठेवण्‍याचे सांगण्‍यात आले होते. या प्रकारातील ती मुलगी कोण व तिचे पालक कोण तसेच त्‍या मुलीचे कोणाबरोबर चित्रीकरण झाले, याची इत्‍यंभूत चर्चा संपूर्ण गावात हळूवारपणे कुजबजुत सुरु होती. सदरच्‍या प्रकाराची तसेच त्‍या मुलीबाबत जादा माहिती प्रसिध्‍द करण्‍यात येऊ नये, तसेच त्‍या प्रकारावर जास्‍त प्रकाशझोत टाकू नये, अशी विनंती बार्शी पोलिसांनी केली आहे.
    सदरच्‍या घटनेबाबत पालकांनी जिल्‍ह्यातील वरिष्‍ठ अधिका-यांना दूरध्‍वनी करुन कळविल्‍याने त्‍याची तात्‍काळ दखल घेण्‍यात आली व गुन्‍हा झिरोने दाखल होत, पुन्‍हा बार्शी पोलिसात वर्ग करण्‍यात आला. सदरच्‍या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आमोद भुजबळ हे करीत आहेत.
 
Top