सोलापूर -:  दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूर येथील लघुपाटबंधारे तलावातील लोक सहभागातून गाळ काढणे कामाचा शुभारंभ पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आला.
    यावेळी माजी गृहराज्य मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, लघुपाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. दाभाडे, दक्षिण सोलापूर तहसिलदार शिल्पा ठोकडे उपस्थित होते.
    यावेळी बोलतांना पालकमंत्री प्रा. ढोबळे म्हणाले की, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याची साठवण क्षमता वाढविली पाहिजे. यासाठी जिल्ह्यातील तलावांमध्ये साचलेला गाळ काढून टाकला पाहिजे म्हणजे पावसाळ्यात या तलावांमध्ये पाणी साठुन पाण्याच्या दुर्भिक्षाला तोंड द्यावे लागणार नाही. तसेच तलावातील काढलेला गाळ शेतक-यांनी त्यांच शेतात नेल्यास त्यावर कोणतीही रॉयल्टी आकारण्यात येणार नाही. रामपूर परिसरातील दोन्ही तलावांचे गाळ काढून या तलावातील पाणी एकत्रित करण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिका-यांना दिल्या.
    म्हेत्रे यांनी परिसरातील अनेक तलावातील गाळ काढण्याची कामे प्रशासनाने तातडीने हाती घेण्याची गरज असल्याचे सांगितले.
    यावेळी जिल्हाधिकारी डॉ. गेडाम म्हणाले की, तलावातील गाळ हा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असुन शेतक-यांना हा गाळ मोफत दिला जाईल.
    तहसिलदार श्रीमती ठोकडे म्हणाल्या की, या तलावातील 10 फुट काढल्यास किमान चार वर्षे परिसरातील 400 एकर जमीनीला पाणी उपलब्ध होईल.
    कार्यक्रमास इतर  अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top