नळदुर्ग -: गुरुवार रोजी सायंकाळी नळदुर्ग व परिसराला अवकाळी पावसाने तास भरापेक्षा अधिक वेळ जोरदारपणे झोडपून काढले. या अवकाळी पावसामुळे व वादळी वा-यामुळे परिसरातील अनेक मोठमोठे वृक्ष उन्‍मळून पडले. राष्‍ट्रीय महामार्गावर वृक्ष उन्‍मळून पडल्‍याने त्‍याचा रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. तर काही ठिकाणी वीजेच्‍या ता-या तुटल्‍या. घरावरील आणि गोठ्यावरील पत्रे उडून गेल्‍याने अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्‍याचे उघडकीस आले आहे.
    अचानक गेल्‍या काही दिवसापासून नळदुर्ग व परिसरात तापमानाचा पारा उच्‍चांक गाठल्‍याने अंगाची लाही लाही होऊन नागरीक हैराण होऊ लागले. सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्‍याने पाण्‍याच्‍या शोधात वन्‍यजीव भटकू लागले. काही ठिकाणी मानवी वस्‍तीवरही वन्‍यप्राणी पाण्‍यासाठी आल्‍याचे उदाहरण सर्वश्रूत आहे. त्‍यातच गुरुवार दि. 25 एप्रिल रोजी दिवसभर उकाडयाने हैराण केले होते. तर अधूनमधून ढगाळ वातावरणामुळे वा-याची झुळूक नसल्‍याने वृक्षाचे पानही हलत नव्‍हते. त्‍यातच सायंकाळी साडे पाचनंतर वादळी वारे वाहू लागले, विजांचा कडकडाट व जोरदार अवकाळी पावसाने नळदुर्ग शहर व परिसराला झोडपण्‍यास सुरुवात केली. तुळजापूर तालुक्‍यातील मुर्टा, सलगरा, मानेवादी, चिकुंद्रा, होर्टी, अणदूर, जळकोट, येडोळा, लोहगाव, शहापूर, निलेगाव, खुदावाडी, केशेगाव, इटकळ, फुलवाडी, धनगरवाडी, चिवरी व लोहारा तालुक्‍यातील वडगाव, हिप्‍परगा (सय्यद), मोघा, खेड, लोहारा (खु.), वाडीवडगाव, नागराळ, कास्‍ती, माळेगाव, जेवळी, धानुरी, आष्‍टा यासह अनेक ठिकाणी पावसाने झोडपून काढले.
       गुरुवारी सायंकाळी या पावसाने परिसरातील आंब्याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून काही ठिकाणी शिल्लक राहिलेल्या द्राक्ष व केळीच्या बागांनाही या पावसाचा फटका बसला. दरम्यान या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. मुर्टा, मानेवाडी, सलगरा, चिकुंद्रा, होर्टी या ठिकणी आंब्‍याबरोच द्राक्षचेही नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत विजांच्‍या कडकडाट, वादळी वारे सुरु होते.
         अणदूर (ता. तुळजापूर) शिवारातील चिवरी गावाच्‍या अलीकडे दिपक शिवाजीराव घुगे यांच्‍या शेतातील जनावरांच्‍या गोठ्यावरील पत्रे वादळी वा-यात उडून गेले. त्‍यामुळे गोठ्यामधील पशुखाद्य, जीवनाश्‍यक वस्‍तू, शेती अवजारे यासह इतर साहित्‍याची नासाडी झाली. या दुर्घटनेत सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाल्‍याचे प्राथमिक अंदाज आहे. या पावसामुळे फुलवाडी येथील शाळेजवळचा बंद पडलेल्‍या हातपंपास पाणी आले. पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाले असले तरी उकाड्याने हैराण झालेल्‍या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. दरम्‍यान काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. गुरुवार रोजी अणदूर येथील आठवडी बाजार भरल्‍याने परिसरातील गावातून आलेल्‍या ग्रामस्‍थांची व व्‍यापा-यांची मोठी तारांबळ उडाली. शुक्रवार रोजी अवकाळी पावसाची चर्चा सुरु होती.
 
Top