सोलापूर -:  मोहोळ तालुक्यातील वाफळे, खंडोबाची वाडी, कुरणवाडी, नालबंदवाडी व कोंबडवाडी आदी गावांतील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात काढण्यासाठी सिना-माढा योजनेतून लिफ्टद्वारे पाणी देता येईल का याची चाचपणी करण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी दिली.
       मोहोळ तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे ना. शिंदे हे बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे होते. याबाबत वरील ग्रामपंचायतींनी त्वरीत ठराव करुन हे ठराव मंत्रालय स्तरावर पाठवावेत असे सांगून ना. शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या समस्येने वेढला गेला आहे. अशा परिस्थितीत शेतक-याने खचून जाऊ नये. केंद्र सरकारच्यावतीने राज्यातील शेतक-याला दिलासा देण्याचे काम सुरु असून याचाच एक भाग म्हणून फळबागांच्या नुकसान भरपाईबाबत दोन हेक्टरापर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू यामध्ये केळी पिकाचा समावेश नव्हता या अनुदान योजनेतून वगळण्यात आलेल्या केळीचा या योजनेत समावेश व्हावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जाणार असल्योचही त्यांनी सांगितले.
        यावेळी बोलताना पालकमंत्री प्रा. ढोबळे म्हणाले की, वाफळे व खंडोबाचीवाडी या दरम्यान बांधण्यात येणा-या 'मायनर इरिगेशन' धरणासाठी भूसंपादन करण्यात येणा-या जमिनींचे पैसे शेतक-यांना लवकरात लवकर मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर खंडोबावाडीसह पाच गावची एकत्रित प्रादेशिक योजना खास बाब म्हणुन मंजूर होण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. तर गेली 40 वर्ष अनगरसह लगतचा परिसर अवर्षणग्रस्त असून हा परिसर टँकरमुक्त व्हावा अशी अपेक्षा माजी आ. राजन पाटील यांनी व्यक्त केली. ना शिंदे यांनी अनगर, वाफळे, खंडोबाचीवाडी, देवडी, वडाचीवाडी आदी दुष्काळी भागाची पहाणी केली.
    प्रारंभी ना. शिंदे यांनी अनगर येथील ओढ्याचे रुंदीकरण, खोलीकरण, भागवत शिंदे (शेतकरी) यांच्या शेतातील कोरडे शेततळे तसेच हरी गुंड (शेतकरी) यांची पाण्याअभावी जळालेली डाळींबाची व केळीच्या बागेची पाहणी केली तर वडाचीवाडी येथील चारा छावणीला भेट देवून पशु मालकांशी संवाद साधत, जनावरांना पुरेसा चारा मिळतो   का ?  पशुखाद्य वेळेवर मिळते का ? आदी प्रश्ल विचारले त्याच बरोबर चारा व खाद्य देण्यासाठी सी.सी.टी.व्ही सारखा पारदर्शक उपक्रम राबविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
    याप्रसंगी त्यांच्या समवेत माजी राज्यमंत्री सिध्दराम म्हेत्रे, जि.प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, विष्णुपंत कोठे, मनोहर डोंगरे, बाळासाहेब शेळके, माजी महापौर नलिनी चंदिले, जि.प. सदस्या सीमा पाटील, प्रांताधिकारी महेश आव्हाड, तहसिलदार सदाशिव पडदुणे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी- पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top