सोलापूर -: राज्यातील जनतेला यंदा दुष्काळाची समस्या तीव्रतेने भेडसावत आहे. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना करताना अधिका-यांनी योग्य तो समन्वय ठेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री ना. सुशिलकुमार शिंदे यांनी केली. मोहोळ येथील पंचायत समितीच्या सभागृहात टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
    दुष्काळ निर्मुलनासाठी केंद्र शासनाच्या वतीने 800 कोटी रुपये देण्यात आले आहेत. दुष्काळ हटविण्याबाबत केंद्र व राज्य शासन गंभीर असून राज्यातील पशुधन जगावे यासाठी लहान जनावरांचा 16 ऐवजी 25 तर मोठया जनावरांना 32 ऐवजी 50 रुपये इतके चारा अनुदान करण्यात आले असल्याची माहिती  त्यांनी दिली. या आढावा बैठकीत ना. शिंदे यांनी अधिकारी व लोकप्रतिनिधी कडून समस्या जाणून घेऊन याबाबत मार्गदर्शन केले.
    प्रारंभी तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थिती व प्रशासनातर्फे त्यावर करण्यात येणारे उपाय योजना यांची माहिती देताना सांगितले की, संपूर्ण तालुका हा 50 पैशापेक्षा कमी आणेवारी असलेला तालुका असुन सध्या तालुक्यात 47 टँकर सुरु असुन त्याद्वारे 39 गावे व 206 वाड्यांना पाणीपुरवठा सुरु असल्याचे सांगितले.
    याप्रसंगी पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, जि.प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, प्रांताधिकारी महेश आव्हाड, जिल्हा कृषी अधीक्षक अशोक किरनाळ्ळी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. 
 
Top